मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं,सभागृहात खोटं बोलले;राहुल गांधींचा फडणवीसांवर हल्लाबोल

परभणी : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे जाऊन पीडित सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. परभणीतील आंदोलनानंतर पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. मात्र, न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर दलित समाज संतप्त झाला आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर देताना सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठलीही मारहाण झालेली नाही, असे न्यायाधीशांसमोर सांगितल्याचे फडणवीसांनी म्हटलं होतं. आता, राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर थेट देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष्य केलं आहे, तसेच फडणवीस खोटं बोलत असल्याचंही ते म्हणाले.

मी आज सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली, ज्यांना मारहाण झाली त्यांचीही भेट घेतली. मला त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्टंस दाखवले, व्हिडिओ दाखवले, त्यावरुन ही 100 टक्के न्यायालयीन मृत्यू आहे, पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे. मुख्यमंत्र्‍यांनी विधानसभेच्या सभागृहात पोलिसांना मेसेज देण्यासाठी खोटं बोललंय, असे म्हणत राहुल गांधींनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला. सोमनाथ सूर्यवंशी हे दलित आहेत, ते संविधानाचे रक्षण करत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. ज्या लोकांनी हे केलंय, त्यांना शिक्षा व्हावी, अद्यापपर्यंतच्या कारवाईवर मी संतुष्ट नाही. हे कुठलंही राजकारण नाही, जिम्मेदार विचारधार आहे, मुख्यमंत्र्‍यांनी स्टेटमेंट दिलं आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे म्हणत राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वत्सलाबाई सूर्यवंशी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्‍यांवर हक्कभंग आणणार

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, सोमनाथ सोमवंशी यांना दम्याची बिमारी होती आणि त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. पण, मुख्यमंत्री खोटं बोलले आहेत, विधानसभेची त्यांनी दिशाभूल केली. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री यांच्यावर आम्ही प्रिविलेज मोशन आणू, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले. इथे भेट घेतल्यानंतर राहुल गांधी लोकसभेत सुद्धा भूमिका मांडतील आणि सरकारचं पितळ उघड करतील. ज्या पद्धतीने ठरवून मागासवर्गीयांना आणि बौद्धांना आणि अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्याचं काम बीजेपी करत आहे, ते या ठिकाणी दिसलं आहे. म्हणून या सर्व गोष्टीचा आवाज लोकशाही पद्धतीने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल, असेही नाना पटोले यांनी म्हटलं.

न्यायालयीन चौकशीसाठी समिती स्थापन करणार

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. न्यायालयीन चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. पोलीस कोठडीतून ते जेव्हा एमसीआरमध्ये गेले. तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होतं. तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा

एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही…; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले

अधिक पाहा..

Comments are closed.