कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबईची लाज राखली, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघासाठी ठोकला दावा!
विजय हजारे ट्रॉफी 2024-25 च्या गट ‘क’ चा सामना मुंबई आणि हैदराबाद यांच्यात झाला. हा सामना सुरुवातीपासूनच अटीतटीचा झाला. अखेर मुंबईनं या सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. मुंबईला हा विजय सहजासहजी मिळाला नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. तन्मय अग्रवाल आणि अभिरत रेड्डी यांनी हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावा जोडल्या. यावेळी हैदराबादचा संघ निश्चितपणे किमान 250 धावा करेल असं वाटत होतं. परंतु येथून त्यांच्या विकेट झटपट पडल्या आणि संपूर्ण संघ अवघ्या 169 धावांवर ऑलआऊट झाला. तन्मयनं 64 आणि अभिरतनं 35 धावा केल्या. या दोघांशिवाय यष्टीरक्षक अरवेल अवनीशनं 52 धावांची खेळी केली. या तिघांशिवाय हैदराबादच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
प्रत्युत्तरात, मुंबईची अवस्थाही वाईट झाली. 105 धावांपर्यंत मुंबईनं सात विकेट गमावल्या होत्या. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानं तनुष कोटियनच्या मदतीनं मुंबईला पराभवापासून वाचवलं. तनुषनं नाबाद 39 धावा केल्या, तर अय्यर 20 चेंडूत 44 धावा करून नाबाद परतला. सध्या अय्यरचा ज्या फॉर्ममध्ये दिसत आहे, त्यावरून तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात नक्कीच स्थान मिळवेल, असं वाटतं.
अष्टपैलू तनुष कोटियननं फलंदाजीपूर्वी गोलंदाजीतही कमाल केली. त्यानं 10 षटकांत 38 धावा देत दोन बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या विजयासह मुंबई क गटात तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर या पराभवानंतर हैदराबादची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली.
हेही वाचा –
16 चौकार, 11 षटकार…विजय हजारे ट्रॉफीमध्ये ‘ऋतु’चा राज! 200च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं शतक
सुनील गावस्करांचा टीम मॅनेजमेंटवर राग, अश्विनसोबत झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला!
इशान किशनने ठोकले शानदार शतक! किशनसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडणार?
Comments are closed.