Hingoli Hit & Run : भरधाव कारने पादचाऱ्याला दोन वेळा चिरडले, दुकान आणि दुचाकींचेही नुकसान
हिंगोलीत अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. भरधाव कारने एका पादचाऱ्याला दोन वेळा चिरडल्याची घटना बसमत येथील झेंडा चौकात रविवारी रात्री घडली. यात पादचारी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला. ही चित्तथरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
झेंडा चौकात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात दुकान आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकींचेही नुकसान झाले आहे. भरधाव कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. बाईक आणि दुकानांवर आदळत कारने पादचाऱ्याला धडक दिली. कारची चाके दोनदा त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. सय्यद इलियास असे जखमी तरुणाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नंतर नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर चालक घटनास्थळी कार सोडून पळून गेला. पोलिसांनी सदर कार ताब्यात घेत चालकाचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची पुष्टी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.