Manikrao Kokate reaction to Chhagan Bhujbal decision rrp
नाराज छगन भुजबळ विविध संघटनांसोबत बैठका घेत वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. अशातच भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, असे महत्त्वाचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या छगन भुजबळ विरुद्ध अजित पवार असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत. महत्त्वाचे म्हणजे सध्या ते विविध संघटनांसोबत बैठका घेत वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. अशातच भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, असे महत्त्वाचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. (Manikrao Kokate reaction to Chhagan Bhujbal decision)
माध्यमांशी संवाद साधताना माणिकराव कोकाटे यांना भुजबळाच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, छगन भुजबळ यांना ओबीसी म्हणून फक्त ते स्वत:, त्यांचा मुलगा आणि पुतण्या एवढंच दिसत आहे. बाकी ओबीसी फॅक्टर म्हणून त्यांना दुसरा ओबीसी दिसत नाही. त्यामुळे भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही. कारण चूक असेल तर एकवेळ समजूत काढली गेली असती. पण हा निर्णय घेताना कोणतीही चूक झालेली नाही. छगन भुजबळांना आमच्या पक्षाने जो न्याय दिलाय, तो अन्य कोणत्याही पक्षाने दिलेला नाही, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी भुजबळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
– Advertisement –
हेही वाचा – Ajit Pawar : दादा बीड, परभणी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारा; अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे स्वपक्षीयांची गोची
भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. मधल्या काळात काय काय घडले, सध्या काय काय सुरू आहे, यावर आम्ही एकमेकांशी संवाद साधला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सांगितले की, वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या आहेत. तसेच आपल्याला मान्यच केले पाहिजे की, महायुतीला महाविजय मिळाला, त्यात ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे. इतर घटकांचाही वाटा आहेच. परंतु, विशेष करून ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला, त्याबाबत आपण सर्वांचे आभार मानले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थिती ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात घेईल. तसेच देवेंद्र फडणवीस ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाहीत, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भुजबळ येत्या काही दिवसात काय भूमिका घेतात? हे पाहावे लागेल.
– Advertisement –
हेही वाचा – Nitin Gadkari Apology : जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरकरांची माफी मागतात तेव्हा…काय आहे प्रकरण?
Comments are closed.