केरळमध्ये अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची शक्यता
थोरियम साठ्याचा वापर व्हावा, राज्याची मागणी
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याचा विचार सध्या सुरू आहे. केरळचे ऊर्जामंत्री के. कृष्णनकुट्टी यांनी तिरुअनंतपुरम येथे केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर केंद्र सरकार राज्यात अणुऊर्जा केंद्र स्थापन करण्याचा विचार करू शकते असे मानले जात आहे. परंतु याकरता राज्य सरकारला भूमी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
केरळच्या ऊर्जामंत्र्यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांना एक निवेदन सोपविले असून यात राज्यातील थोरियम भांडाराचा वापर करत वीजनिर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केरळ सरकारने अणुऊर्जा केंद्राची मागणी केली नाही, परंतु केंद्र सरकारला थोरियम भांडाराचा वापर करण्याचे आवाहन केले असल्याचे राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. केरळमध्ये सध्या वीजसंकट तीव्र होत असून राज्य सरकार वीजेसाठी शेजारी राज्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या विजेवरच निर्भर आहे.
राज्यातील विजेची मागणी वाढत असल्याने राज्य सरकारने विजेसाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. परंतु सध्या केरळमध्ये अणुऊर्जा केंद्राच्या मंजुरीसाठी अनेक अध्ययनं होणार असून त्यानंतरच त्याच्या स्थापनेबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. 2030 पर्यंत केरळमध्ये विजेची मागणी वाढून 10 हजार मेगावॅटवर पोहोचू शकते. केरळ सरकारने सेंट्रल ग्रिडमधून राज्याला आणखी वीज पुरविण्याचे आणि राज्याला ऊर्जा सुविधा सुधारण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. केरळमधील ऊर्जा मूलभूत सुविधा सध्या 4260 मेगावॅटपर्यंत सांभाळण्याच्या क्षमतेचे आहे.
केरळच्या ऊर्जा मंत्र्यांनी तलचर ऊर्जा प्रकल्पातून राज्याला 180 मेगावॅटऐवजी 400 मेगावॅट वीज पुरविण्याची मागणी केंद्रीय मंत्र्यांसमोर केली. केरळने पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला राष्ट्रीय संपत्ती घोषित करणे आणि याचा खर्च सर्व राज्यांकडून घेण्याचीही मागणी केली. सध्या केवळ दक्षिणेकडील राज्यांकडून यासाठीचा खर्च वसूल केला जात आहे. केरळ सरकारने तिरुअनंतपुरम, कोची, कोझिकोडमध्ये सर्व पॉवर केबल्सना भूमिगत करण्याचीही मागणी केली आहे.
Comments are closed.