पुंछमध्ये अपघातात ५ जवान शहीद झाले
सैन्याचे वाहन 350 खोल दरीत कोसळले : अनेक सैनिक जखमी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील मेंढर क्षेत्राच्या बलनोई भागात सैन्याचे एक वाहन दरीत कोसळले आहे. या दुर्घटनते अनेक सैनिक जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच सैन्याचे अधिकारी तेथे पोहोचले, बचावकार्य हाती घेत जखमी सैनिकांना रुग्णालयात हलविण्यात आले. तर उपचारादरम्यान 5 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
सैन्य वाहनातून 18 सैनिक प्रवास करत होते असे सांगण्यात येत आहे. जखमी सैनिकांवर उपचार केले जात आहेत. यातील काही जखमी सैनिकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. नीलम मुख्यालयातून बलनोई घोरा पोस्टच्या दिशेने जात असलेल्या सैन्य वाहन घोरा पोस्टनजीक दुर्घटनाग्रस्त झाले. हे वाहन सुमारे 300-350 फूट खोल दरीत कोसळले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच 11 एमएलआयच्या शीघ्र प्रतिसाद पथकाने (क्यूआरटी) तेथे धाव घेत बचावकार्य हाती घेतले होते.
व्हाइट नाइट कॉर्पसकडून या दुर्घटनेची सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे. पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशन ड्युटीदरम्यान सैन्याचे एक वाहन दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत 5 सैनिकांना जीव गमवावा लागला असे म्हणत व्हाइट नाइट कॉर्पसने घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले आहे.
मागील महिन्यात अशाच प्रकारच्या एका दुर्घटनेत जम्मू-काश्मीरच्या राजौली जिल्ह्यात एका सैनिकाला जीव गमवावा लागला होता. तर एक सैनिक जखमी झाला होता. ही दुर्घटना 4 नोव्हेंबर रोजी कालाकोटच्या बडोग गावानजीक घडली होती. 19 ऑगस्ट 2023 रोजी सैन्याचे वाहन 60 फूट खोल दरीत कोसळले होते. या दुर्घटनेत 9 सैनिकांना जीव गमवावा लागला होता.
किश्तवाडमध्ये संशयास्पद हालचाली
दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात मंगळवारी संशयास्पद हालचाली दिसून आल्या. यामुळे सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला घेत शोधमोहीम हाती घेतली. कुंतवाडा क्षेत्रात संशयास्पद हालचालींबद्दल कळल्यावर ग्राम रक्षा गार्डच्या सदस्यांनी गोळीबार केला, यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना तेथे तैनात करण्यात आले. 7 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी ग्राम रक्षा गार्डच्या 2 सदस्यांची ज्या ठिकाणी हत्या केली होती, त्याच ठिकाणी ही घटना घडली आहे.
Comments are closed.