40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट

लाडक्या बहिणींना कमळाबाईने न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. लसूण तब्बल 400 रुपये किलोवर गेला आहे, तर काही भाज्या 30 ते 40 रुपयांनी महागल्या आहेत. महागाईमुळे गृहिणींच्या किचनचे बजेट अक्षरशः कोलमडून गेले आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज थेट दिल्लीतील भाजी मंडईत पोहचले. त्यांनी महिलांशी संवाद साधला आणि कधीतरी 40 रुपयांना मिळणारा लसूण 400 रुपये झाला असूनही सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपून आहे, असा हल्ला चढवला.

इंधनाचे गगनाला भिडलेले दर आणि वाहतुकीचा वाढलेला खर्च यामुळे भाज्या, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही कडाडले असून खायचे काय आणि जगायचे असा यक्षप्रश्न लाडक्या बहिणींसमोर आहे. 60 ते 80 रुपयांना मिळणारी भेंडी आणि गवार आता 120 रुपये किलोने विकली जात आहे. दोडक्याचे दरही 20 ते 30 रुपयांनी वाढले असून अनेक भाज्या 15 ते 20 रुपयांनी महाग झाल्या आहेत. महागाईमुळे महिला भाज्या खरेदी करताना प्रचंड हुज्जत घालत असल्याचे प्रभादेवीच्या भाजी मार्केटमधील भाजीविक्रेते सूर्यकांत कंदरफळे यांनी सांगितले.

शेवग्याचे दर घसरूनही डबल सेंच्युरीच

60 ते 80 रुपये किलोने मिळणाऱ्या शेवग्याच्या शेंगा 400 रुपयांवर गेल्या होत्या. त्यांचे दरही केवळ निम्म्याने कमी झाले आहेत. म्हणजेच दर कमी होऊनही शेवग्याची डबल सेंच्युरीच आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये मिळणारा सांबार तसेच शेवग्याच्या शेंगांचा वापर होणाऱ्या इतर डिशेसचे दर कमी होण्याची चिन्हे कमीच आहेत.

खायचे काय, जगायचे कसे?

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाचे दर कमी होत नसल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाज्या, फळांच्या वाहतुकीचा खर्चही सहाजिकच वाढला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले असून किरकोळ बाजारात त्यांची किंमतही वाढत आहे. तर दुसरीकडे खराब हवामानाचा फटका बसल्यामुळे बाजारात काही भाज्यांचे प्रमाण कमी आहे. त्याचाही परिणाम दरवाढीवर झाल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. सर्वामान्यांचे जगण्याचे बजेटच कोलमडून गेल्याची प्रतिक्रिया प्रभादेवीतील गृहिणी कांचन हजारे यांनी दिली.

राहुल गांधी भाजी मंडईत; महिलांनी सांगितली महागाईची कहाणी

राहुल गांधी यांनी दिल्लीतील भाजी मंडईत जाऊन भाज्यांचे दर जाणून घेतले. यावेळी त्यांनी काही महिलांशी संवाद साधला. भाज्यांचे दर प्रचंड कडाडले असून किचनचे बजेट कोलमडल्याचे महिलांनी सांगितले. कमाईच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर अधिक खर्च होत असल्याने जगणेच महाग झाल्याचे त्या म्हणाल्या. याबाबतचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून शेअर केला आहे.

Comments are closed.