विमान प्रवासाच्या सामानासाठी नवीन नियम

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

विमान प्रवास करताना प्रवासी जे हातसामान (हँडलगेज) स्वत:बरोबर घेतात त्यासंबंधी प्रवासी विमान वाहतूक विभागाने नवीन नियमांची घोषणा केली आहे. सर्व प्रवाशांनी या नव्या नियमांची माहिती करून घ्यावी. नियम माहीत नसल्यास किंवा तो न पाळल्यास प्रवाशांची अडचण होऊ शकते, असे आवाहनही प्रवासी विमान वाहतूक विभागाने केले आहे. यापुढे इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणारी एक व्यक्ती स्वत:सह एक हँडबॅगमध्ये केवळ सात किलो किंवा त्यापेक्षा कमी वजनाचे समान घेऊ शकेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

विमान प्रवाशांना यापुढे स्वत:समवेत केवळ एक हँडबॅग नेता येईल. तसेच या हँडबॅगेचे वजन सात किलोपेक्षा अधिक असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विमान प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी तपासणी केंद्रासमोर प्रवाशांची गर्दी होत आहे. प्रवाशासह अधिक सामान असल्यास त्याची तपासणी करण्यासही वेग लागत आहे. म्हणून या सामानावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.

सर्व प्रकारच्या प्रवासासाठी

विमान प्रवास देशांतर्गत असला किंवा आंतरराष्ट्रीय असला तरी स्वत:समवेत घेऊन जाण्यायोग्य सामानासंबंधी हाच नियम असेल. प्रिमियम इकॉनॉमी क्लासमधून  प्रवास करणाऱ्यांसाठी सामानच्या वजनाचा नियम 10 किलोचा आहे. म्हणजेच या क्लासचा प्रवासी विमानात स्वत:समवेत 10 किलो किंवा त्यापेक्षा कमी वजनाचे सामान असलेली एक हँडबॅग नेता येऊ शकेल. फर्स्ट क्लासमधून प्रवास करणारा प्रवाशासाठी ही मर्यादा एक हँडबॅगेत 12 किलो वजन अशी आहे.

आकार 115 सेमी

एकंदर हँडबॅगेचा आकार 115 सेमीच्या वर असता कामा नये, असेही नव्या नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रवाशांनी 2 मे 2024 च्या पूर्वी तिकीट बुक केले आहे, त्यांना नव्या नियमातून सूट देण्यात आली आहे. इंडिगो विमान कंपनीने हा 115 सेमी आणि 7 किलो वजनाचा नियम पूर्वीपासूनच लागू केला आहे. याखेरीज ही विमान कंपनी प्रवाशांना त्यांच्यासह एक छोटी बॅग (लेडिज पर्स, किंवा तत्सम) नेण्यास अनुमती देते. आता या कंपनीलाही नवा नियम लागू करावा लागणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.