Sangli News – सांगलीतील एक लाख शेतकरी बहिणी ‘नावडत्या’
दीड महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून जिल्ह्यातील सुमारे १ लाख शेतकरी महिलांच्या नावाला कात्री लावली जाणार आहे. या महिलांना वार्षिक 18 हजार रुपयांऐवजी ‘शेतकरी महासन्मान’ आणि ‘पंतप्रधान किसान सन्मान योजने’ अंतर्गत देण्यात येणारे प्रत्येकी सहा हजार देण्यात येणार आहेत. त्यामुळे या शेतकरी महिलांना वर्षाला 18 हजार रुपयांऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय ‘लाडकी बहीण’ योजनेची रक्कम घेतलेल्या महिलांच्या खात्यातून ‘महासन्मान योजने’तून कपात केली जाणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण आणि शेतकरी सन्मान या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना सरकारने धक्का दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फटका बसल्यानंतर खडबडून जागे झालेल्या भाजपाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. प्रतिमहिना 1500 रुपये महिलांना देण्यात आले.
विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने पाच हप्त्यांचे 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यावर 7500 रुपये जमा केले. अर्ज करतील त्या महिलांना लाभ देण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबले होते. विधानसभा निवडणुकीआधी कोणतेही निकष न लावता 2 कोटी 63 हजार महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यापैकी 2 कोटी 52 लाख महिलांना पात्र ठरविण्यात आले होते. नुकताच डिसेंबर महिन्याचा हप्ताही महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून, आजअखेर 21 हजार 600 कोटी रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेल्या योजनेबाबतही तेथील सरकारने निकष लावण्याचा निर्णय घेतला असून, सध्या केवळ १२ टक्के महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात आता महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सरसकट देण्यात येणाऱ्या लाभाला टाच लावली जाणार आहे. अडीच लाखांवर उत्पन्न, चारचाकी वाहन आणि इतर निकष लावून महिला लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याबरोबरच राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही पत्ता कापण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक लाभाथीं ‘शेतकरी महासन्मान’ आणि थेट लाभ हस्तांतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे.
योजना सुरू करण्याआधीच मागविली होती आकडेवारी
‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्याआधीच राज्य सरकारने ‘डीबीटी’ आणि ‘शेतकरी महासन्मान’ योजनेतील लाभार्थी महिलांची आकडेवारी मागितली होती. त्यामुळे कृषी आयुक्तालयातून पीएम किसान पोर्टलवरून आकडेवारी जमा करून महिला व बालविकास विभागाला देण्यात आली होती. ६ जुलैच्या आकडेवारीनुसार राज्यात कृषी विभागाच्या थेट हस्तांतर महिला लाभार्थ्यांची संख्या 10 लाख 90 हजार 465, तर शेतकरी महासन्मान योजनेतील महिला अर्जदार 19 लाख 20 हजार 85 होती. यापैकी डीबीटी लाभार्थी एक लाख 71 हजार 954, तर शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थी 18 लाख 18 हजार 220 इतक्या महिला होत्या. सांगली जिल्ह्यात एक लाखावर महिला शेतकरी आहेत, त्यांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या महिलांना ‘शेतकरी महासन्मान’ योजनेअंतर्गत वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येतात, तर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत 18 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे केवळ 12 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
Comments are closed.