एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत अनेक चुकीची कामे झाली! गणेश नाईक यांनी मिंध्यांना डिवचले

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत अनेक चुकीची कामे झाली. त्यांची इच्छा नसतानाही अनेक चुकीच्या घटना घडल्या. या चुकीच्या घटना नजरेला चांगल्या दिसत नव्हत्या, तरी जाऊ द्या म्हणत त्या सहन कराव्या लागल्या, असा हल्लाबोल वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी नवी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एका जाहीर कार्यक्रमात केला. नाईक यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचल्यामुळे महायुतीमध्ये सर्वच काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नशामुक्त नवी मुंबई या अभियानाचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला.

शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात नवी मुंबई शहरात अनेक चुकीच्या घटना घडल्या. या चुकीच्या घटना घडाव्यात अशी शिंदे यांचीही इच्छा नव्हती. मात्र तरीही त्या घडवून आणल्या गेल्या. या घटना नजरेला चांगल्या दिसत नसल्या तरी त्या नाइलाजास्तव सहन कराव्या लागल्या. जाऊ द्या, जाऊ द्या असे म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे लागले, अशीही नाराजी यावेळी गणेश नाईक यांनी व्यक्त करून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीच अक्षरशः वाभाडे काढले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता जॉन अब्राहम, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

Comments are closed.