इलॉन मस्क, प्रियांका चतुर्वेदा सहमत

ब्रिटनमधील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना ‘आशियायी’ संबोधण्यास विरोध

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

ब्रिटनमध्ये सध्या अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळ्यांचा विषय गाजू लागला आहे. या टोळ्या ब्रिटनमध्ये स्थलांतरीत झालेल्या पाकिस्तानी, अल्जेरियन्स, सुदानी मुस्लीम तरुणांच्या आहेत. अल्पवयीन आणि शाळकरी ब्रिटीश गोऱ्या मुलींना आपल्या नादाला लावून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार या टोळ्या करतात. पण ब्रिटनमध्ये तेथील प्रशासनाकडून त्यांचा उल्लेख आशियायी लोकांच्या टोळ्या असा केला जातो. अशा टोळ्यांचा उल्लेख ‘आशियायी’ असा करण्यास शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी विरोध दर्शविला आहे. अमेरिकेचे जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनीही प्रियांका चतुर्वेदी यांचे समर्थन केले आहे.

अशा अत्याचारी टोळ्यांचा उल्लेख ‘आशियायी’ टोळ्या असा केल्याने ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या हिंदू नागरीकांसंबंधी गैरसमज निर्माण होतात. कारण तेथील भारतीय किंवा भारतीय वंशाचे लोक हे ही आशियायीच आहेत. त्यामुळे अशा टोळ्यांचा उल्लेख सरसकट आशियायी अशा शब्दाने करु नये, असे मत ब्रिटनमधील आणि ब्रिटनबाहेरील अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे. इलॉन मस्क यांनी, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांचा विजय झाल्यानंतर, ब्रिटनमधील या अत्याचारांच्या मुद्द्यावर पुन्हा प्रकाश टाकला होता. ब्रिटनमधील ही ‘लव्ह जिहाद’ प्रकरणे 2000 सालापासून होत असून आतापर्यंत किमान एक लाख अल्पवयीन शाळकरी मुली बळी पडल्या आहेत, असे आरोप होत आहेत. आतापर्यंत 20 पाकिस्तानी युवकांना या प्रकरणांमध्ये कारावासाची शिक्षाही झाली आहे. ब्रिटनमध्ये सध्या मजूर पक्षाचे सरकार असून हे सरकार या आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि व्होटबँकेसाठी या प्रकरणांकडे डोळेझाक करीत आहे, असाही आरोप आहे. इलॉन मस्क यांनी तर ब्रिटनमधील हे सरकार लवकरात लवकर गेले पाहिजे, असे मत या संदर्भात व्यक्त केले आहे.

हिंदू शीख संघटनांचाही विरोध

ब्रिटनमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या टोळ्यांचा उल्लेख ब्रिटनचे सध्याचे नेते केर स्टार्मर यांनीही एशियन गँग्ज असा केला होता. त्याला ब्रिटनमधील हिंदू आणि शीख संघटनांनी विरोध केला आहे. या टोळ्या आशियायी लोकांच्या नाहीत. त्या पाकिस्तानी गुन्हेगारांच्या आहेत. राजकीय सोयीसाठी त्यांचा उल्लेख ब्रिटीश सत्ताधारी नेत्यांनी आशियायी टोळ्या असा करु नये, असा इशारा या संघटनांनी त्यांना दिला आहे. आपण इस्लामविरोधी आहोत असा आरोप आपल्यावर होऊ नये यासाठी ब्रिटीश सत्ताधारी ‘आशियायी’ या शब्दाचा आधार घेतात. तथापि, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लीमेतर आशियायी समुदायांसंबंधी गैरसमज निर्माण होतात, अशी टीका ब्रिटनमधील अनेक संघटनांनी केली आहे.

प्रकरण नेमके काय ?

ब्रिटनमधील हे प्रकरण दोन दशकांपूर्वीपासून होत आहे. ब्रिटन हा पुढारलेला आणि पुरोगामी लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. पुरोगामीपणाच्या नादात व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक झाल्याने या देशातील कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे आईवडीलांच्या प्रेमाला आणि संरक्षणला पारख्या झालेल्या असंख्य अल्पवयीन मुली या देशात आहेत. 2000 सालापासून ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तान आणि इतर मुस्लीम देशांमधून स्थलांतरीतांना येऊ देण्यात आले. या स्थलांतरासाठी प्रामुख्याने तेथील मजूर पक्षाने पुढाकार घेतला होता, असा आरोप आहे. या स्थलांतरित तरुणांनी ब्रिटनमधील अशा अल्पवयीन मुलींना नादी लावून त्यांचे संघटीतपणे त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. सध्या ही प्रकरणे जगभर गाजत असून ब्रिटनमधील सरकारवर टीका होत आहे.

Comments are closed.