आदित्य ठाकरे यांची बदनामी करणारा फेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदि्य ठाकरे यांची बदनामी करणारा फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, सचिव विनायक राऊत यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संबंधित आरोपीचा शोध सुरू केला आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे, ठाकरे घराणे आणि मातोश्रीची बदनामी करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपपुरस्कृत आयटी सेलच्या माध्यमातून केले जात असल्याची माहिती आहे. सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादानेच या टोळक्याचे हे विकृत उपद्व्याप सुरू आहेत. या विकृतांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सायबर सेलच्या प्रमुखांना केली आहे.
सायबर सेलकमध्ये व्हिडीओ हटवण्याची मागणी केलेली असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. हा व्हिडीओ व्हॉट्सअपवरून व्हायरल होत असल्याने त्याचे मूळ शोधणे कठीण जात आहे. मात्र पोलिसांनी तत्परतेने यात लक्ष घातले आहे, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सदर व्हिडीओ अंधेरी एमआयडीसी भागात काही महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईचा आहे. या कारवाई दरम्यान ज्या बारबाला आढळल्या तो बार आदित्य ठाकरे यांच्या मालकीचा आहे असे दाखवण्याचा घाणेरडा प्रयत्न व्हिडीओच्या माध्यमातून केला जात आहे. याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली असून राजकीय नेत्यांची बदनामी करणाऱ्या सोशल मिडिया हँडलवर कायमस्वरुपी आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करा अशी विनंती पोलिसांना केली आहे.
Comments are closed.