‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्रशासनाचा सांस्कृतिक विभाग आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित 21 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रफिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू – रावराणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’या विशेष पुरस्काराने सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी चित्रपट जगतात लेखकांना त्यांचा योग्य तो मान व दाम मिळणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केलं. आपल्याकडे उत्तम कलागुणांची खाण असून त्याला योग्य तो वाव देत आपल्या मातीतल्या प्रादेशिक कलाकृतींसाठी आपण आग्रही राहायला हवे असं मत त्यांनी याप्रसंगी मांडलं. आपल्या चित्रपटांची परंपरा ही गीत-संगीताची आहे. असं असताना हल्लीच्या चित्रपटांमध्ये मला गीत- संगीताचा अभाव दिसतो. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ही परंपरा आवर्जून जपली जाते . आपल्याकडे चित्रपटांमध्ये गीत- संगीताला जर महत्त्व दिलं तर आपला चित्रपट हा जागतिक दृष्टया नक्कीच नावाजला जाईल असे मत लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
Comments are closed.