मेलबर्नमध्ये अन्नातून केला होता विषप्रयोग, टेनिस सम्राट नोव्हाक जोकोविचचा दावा

जानेवारी 2022 मध्ये मेलबर्नमध्ये ज्या हॉटेलमध्ये मला डांबण्यात आले तेथे अन्नातून माझ्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा खुद्द टेनिस सम्राट नोव्हाक जोकोविचने केल्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ माजली आहे. उद्या रविवारपासून ऑस्ट्रेलियन ओपनला प्रारंभ होत असल्याने स्पर्धेच्या पूर्व संध्येला झालेल्या दाव्यांमुळे नव्या वादाला ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी जोकोविचने कोविडची लस न घेतल्यामुळे स्पर्धेत खेळण्यापासून रोखण्याचा अभूतपूर्व प्रकार घडला होता. या स्पर्धेपूर्वी जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली होती. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने जोकोविचला ताब्यात घेण्याचा धाडसी प्रकार केला. त्यानंतर थेट त्याचा व्हिसा रद्द करून त्याला परत पाठवण्यात आले होते. ही कारवाई करताना त्याला मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्याचदरम्यान त्याच्यावर विषप्रयोग केल्याचा खळबळजनक दावा जोकोविचने केला आहे.

मला आधीपासूनच काही आरोग्यविषयक समस्या होत्या. त्यामुळे मेलबर्नमधील हॉटेलमध्ये मला डांबून माझ्या जेवणात विष मिसळण्याचा प्रकार झाला होता. सर्बियाला परतल्यावर मला हे प्रखरतेने जाणवले. मी ही गोष्ट तेव्हा कुणालाही जाहीरपणे सांगितली नाही, पण माझ्या शरीरात जड लोहपदार्थांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असल्याचेही चाचणीदरम्यान दिसून आले. माझ्या शरीरात शिसे आणि पाऱ्याचेही प्रमाण अधिक होते.

2022 साली जोकोविचविरुद्ध झालेल्या प्रकारामुळे त्याचे हक्काचे जेतेपद हुकले होते. 2008 साली ऑस्ट्रेलियन ओपन जिंकूनच जोकोविचच्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदांची सुरुवात झाली होती.

ग्रॅण्डस्लॅमच्या सिल्व्हर ज्युबिलीसाठी सज्ज

जोकविचने कारकीर्दीत एकूण 24 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदे जिंकली असून तो आता आपल्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदांची सिल्व्हर ज्युबिली करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानेही करिअर गोल्डन स्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आतापर्यंत राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ या चार खेळाडूंनाच करिअर गोल्डन स्लॅम जिंकता आले आहे. एकाच कॅलेंडर वर्षात चारही ग्रॅण्डस्लॅम आणि सोबतीला ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला ‘गोल्डन स्लॅम’ विजेता म्हणून संबोधले जाते.

Comments are closed.