दाट धुक्यामुळे अनेक गाड्यांना उशीर झाला

काश्मीरमध्ये तापमान उणे 10 अंश सेल्सिअसवर, मध्य प्रदेशात पारा 2.8 अंशांवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील 16 राज्यांमध्ये शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दाट धुके होते. उत्तर भारतात दुपारपर्यंत अनेक शहरांमध्ये धुके दिसून आले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम उणे 10 अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात थंड होते. हिमाचल प्रदेशातील ताबो येथे तापमान उणे 11 अंश नोंदवले गेले. दिल्लीच्या काही भागात दृश्यमानता शून्यावर नोंदवली गेली. यामुळे 45 गाड्या उशिराने धावल्या. उत्तर प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये दृश्यमानता 100 मीटरपर्यंत कमी झाली. सुमारे 88 रेल्वेगाड्या कानपूर स्टेशनवर वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात एकूण 133 गाड्या उशिराने धावल्या.

जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी झाल्यामुळे मैदानी भागात थंडी वाढली आहे. मध्यप्रदेशातील शहडोल येथे तापमान 2.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शनिवारी सकाळी जयपूर आणि अजमेरसह राजस्थानातील 15 शहरांमध्ये पाऊस झाला. येथील 5 जिह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. राजस्थानमधील तापमान आणखी कमी होईल, असे हवामान खात्याने सांगितले.

Comments are closed.