महिलेवरील हल्ल्यानंतर मणिपूर पुन्हा तापले आहे
दोन गावांमध्ये कर्फ्यू : जमावाचा आसाम रायफल्स कॅम्पवर हल्ला
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या कांगपोक्पी जिह्यातील कंसाखुल आणि लीलोन वैफेई या दोन शेजारील गावांमध्ये शनिवारपासून कर्फ्यू लागू करण्यात आला. पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही गावे आणि त्यांच्या आसपासच्या भागातील लोकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे.
एका गावातील कुकी तरुणाने दुसऱ्या गावातील नागा महिलेवर केलेल्या कथित हल्ल्यानंतर येथे तणाव आहे. दरम्यान, कामजोंग जिह्यातील होंगबाई भागात असलेल्या आसाम रायफल्सच्या तात्पुरत्या छावणीवर जमावाने हल्ला करून तो उद्ध्वस्त केला. जमावाला पांगवण्यासाठी सैनिकांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबार केला.
आठवडाभरापासून हिंसाचार
कांगपोक्पी जिह्यात एका आठवड्याहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. 3 जानेवारी रोजी कुकी समुदायाच्या लोकांनी कांगपोक्पी पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर यांच्यासह अनेक पोलीस जखमी झाले. कुकी लोक इंफाळ पूर्व जिह्याच्या सीमेवर असलेल्या सायबोल गावातून सुरक्षा दलांना हटवण्याची मागणी करत होते.
मणिपूरच्या चुराचांदपूर आणि तेंग्नौपाल जिह्यात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी शस्त्रs आणि स्फोटके जप्त केली आहेत. चुराचंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ओल्ड गेलमोल गावात शोधमोहीम राबवण्यात आली. ज्यामध्ये एके-56 रायफल, आयईडी बॉम्ब आणि चिनी दारूगोळा जप्त करण्यात आला.
Comments are closed.