देश गरिबीमुक्त होईल तो दिवस दूर नाही!
विकसित भारत ‘यंग लीडर्स डायलॉग’मध्ये पंतप्रधानांचे प्रतिपादन : नवनवीन ध्येय साध्य करण्यावर भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम येथे विकसित भारत ‘यंग लीडर्स डायलॉग-2025’ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी संपूर्ण भारत गरिबीमुक्त होण्याचा दिवसही दूर नाही, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. विकसित भारताच्या या प्रवासात आपल्याला दररोज नवीन ध्येये निश्चित करून ती साध्य करावी लागतील. गेल्या काही वर्षात देशाने आपल्या लोकसंख्येच्या 25 टक्के लोकसंख्येचा विकास केला आहे. कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आता भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय साध्य करणार आहे. सध्या देश वेगाने मार्गक्रमण करत असून संपूर्ण भारत गरिबीमुक्त होण्याचा दिवस दूर राहिलेला नाही, असे पंतप्रधान म्हणाले. भारत आर्थिक, सामरिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम होत आहे.
आज तुमच्याशी बोलत असताना, मी विकसित भारताचे चित्र देखील पाहत आहे. विकसित भारतात आपल्याला काय पहायचे आहे? आपल्याला कोणत्या प्रकारचा भारत पहायचा आहे? विकसित भारत म्हणजे असा भारत जो आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत होणे अपेक्षित आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि परिसंस्थाही मजबूत व समृद्ध व्हायला हवी. प्रत्येक देशवासियाची दिशा एकच असल्यास विकसित भारतचे उद्दिष्ट गाठण्यात निश्चितपणे यश मिळेल. जगातील कोणतीही शक्ती आपल्याला विकास होण्यापासून रोखू शकणार नाही, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
‘यंग लीडर्स डायलॉग-2025’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी सुमारे 45 मिनिटे भाषण करताना विकसित भारत, युवा शक्ती, अमृतकाल आणि भारताच्या भविष्याबद्दल भाष्य केले. या कार्यक्रमात 3 हजारांहून अधिक तरुण सहभागी झाले होते. भाषणापूर्वी पंतप्रधानांनी युवा वर्गाने भरविलेले प्रदर्शन पाहिले. तिथे उपस्थित असलेल्या तरुणांशी संवादही साधला.
अमेरिकेचे उदाहरण
1930 च्या दशकात अमेरिका एका गंभीर आर्थिक संकटात सापडली असताना तेथील लोकांनी आपल्याला त्यातून बाहेर पडायचे आणि वेगाने पुढे जायचे ध्येय निश्चित केले. त्यांनी निवडलेल्या मार्गामुळे अमेरिका केवळ त्या संकटातून बाहेर पडली नाही तर विकासाचा वेगही अनेक पटींनी वाढवला. जगात असे अनेक देश, घटना, समाज आणि गट आहेत. आपल्या देशातही अशी अनेक उदाहरणे असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
भारताची वेगवान वाटचाल
आज जग भारताच्या प्रगतीकडे आश्चर्यचकीत होऊन पाहत आहे. आम्ही जी-20 मध्ये हरित ऊर्जेसाठी आमची वचनबद्धता व्यक्त केली होती. पॅरिस वचनबद्धता पूर्ण करणारा भारत जगातील पहिला देश बनला. ते नियोजित वेळेपेक्षा 9 वर्षे आधी पूर्ण झाले. आता भारताने 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य देखील 2030 पूर्वी साध्य केले जाईल, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
Comments are closed.