इस्रोने डॉकिंग चाचणी सुरू केली
स्पॅडेक्स मोहीम : डेटा विश्लेषणानंतर प्रक्रिया पूर्ण होणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी स्पेस डॉकिंग चाचणी प्रक्रियेला यशस्वीरित्या सुरुवात केली. इस्रोने प्रथम दोन्ही अवकाश उपग्रहांमधील अंतर 15 मीटर आणि नंतर 3 मीटर ठेवल्यानंतर दोन्ही उपग्रहांना सुरक्षित अंतरावर परत नेण्यात आले. आता डॉकिंग चाचणीचे डेटा विश्लेषण केले जात आहे. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल. यापूर्वी स्पॅडेक्स मोहिमेतील डॉकिंग प्रक्रिया दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. सुरुवातीला 7 जानेवारी रोजी आणि नंतर 9 जानेवारी रोजी ही प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता ही प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
इस्रोने 30 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथून स्पॅडेक्स म्हणजेच स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मोहीम प्रक्षेपित केली होती. या अंतर्गत, पीएसएलव्ही-सी60 रॉकेटद्वारे पृथ्वीपासून 470 किमी अंतरावर दोन अंतराळयान तैनात करण्यात आले. ही मोहीम यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीन नंतर असे करणारा भारत चौथा देश बनणार आहे. आतापर्यंत या मोहिमेची वाटचाल यशस्वीपणे सुरू असून एकेक नवा टप्पा गाठला जात आहे. ही डॉकिंग चाचणी यशस्वी झाल्यास भारताच्या ‘चांद्रयान-4 अभियाना’त मोठे यश मिळू शकते. त्याअंतर्गत चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. चांद्रयान-4 मोहीम 2028 मध्ये लाँच केली जाऊ शकते.
स्पॅडेक्स मोहिमेंतर्गत आता दोन अंतराळयान वेगवेगळ्या कक्षेत सोडण्यात आली. तैनातीनंतर दोन्ही अंतराळयानांनी सुमारे 28,800 किलोमीटर प्रतितास वेगाने अवकाशात प्रवास केला. हा वेग बंदुकीच्या गोळीच्या वेगापेक्षा 10 पट जास्त होता. दोन्ही अंतराळयानांमध्ये थेट संपर्काचा संबंध नव्हता. त्यांना जमिनीवरून मार्गदर्शन केले जात होते. सध्या दोन्ही अंतराळयान एकमेकांच्या जवळ आणण्यात आले आहेत. यशस्वी डॉकिंगनंतर दोन्ही अंतराळयानांमधील विद्युत ऊर्जा हस्तांतरणाचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. त्यानंतर अंतराळयान अनडॉक होतील आणि दोन्हीही त्यांच्या संबंधित पेलोडवर काम सुरू करतील. ही मोहीम सुमारे दोन वर्षे मौल्यवान डेटा प्रदान करणार आहे.
Comments are closed.