ठाण्यात लॉण्ड्रीला भीषण आग; गंगाविहार सोसायटीतील 250 जणांचे वाचले प्राण

शहरातील गजबजलेल्या श्रीनगर परिसरातील नित्यानंद लॉण्ड्रीला आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कपडे, फर्निचरसह लाखोंचे नुकसान झाले. या आगीची झळ व धुराचे लोट गंगाविहार सोसायटीत सर्वत्र पसरल्याने एकच हाहाकार उडाला. साखरझोपेतील सर्वजण खडबडून जागे झाले व त्यांनी जीवाच्या आकांताने घराबाहेर धूम ठोकली. त्यामुळे २५० जणांचे प्राण वाचले. लॉण्ड्रीमधील तीन मोठे गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा अनर्थ घडला असता. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे.

गंगाविहार ही चार मजली इमारत असून तेथील तळमजल्यावर ३५०० चौरस फूट जागेत नित्यानंद ही मोठी लॉण्ड्री आहे. या इमारतीमधील प्रत्येक मजल्यावर १२ कुटुंबे राहतात. पहाटे ५ च्या सुमारास अचानक इमारतीमधून धूर येऊ लागल्याने झोपेत असलेल्या रहिवाशांना ठसका लागला. अनेकांना श्वास घेणेही कठीण झाले. नेमके काय झाले हे समजेना. आग वाढत असल्याचे बघून अनेक रहिवासी घराबाहेर पळाले. तर काहींना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. या रहिवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

एक तास झुंज

नित्यानंद लॉण्ड्रीला लागलेल्या आगीमध्ये इस्त्री, लाकडी कपाटे, कपडे, वायरिंग सारे काही जळून खाक झाले. लॉण्ड्रीमध्ये तीन मोठे गॅस सिलिंडर होते. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून हे सिलिंडर आगीच्या वेढ्यातून बाहेर काढले.

राबोडीत १५ जणांची केली सुटका

राबोडीतील साकेत काँप्लेक्समधील सहाव्या मजल्यावर एका घरातील किचनला संध्याकाळी आग लागली. त्याचा धूर सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली. ही आग सातव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन १५ रहिवाशांची सुखरुप सुटका केली.

Comments are closed.