काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन
‘इंदिरा गांधी भवन’ असे नामकरण : सोनिया गांधींच्या हस्ते कार्यक्रम
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय मुख्यालय वास्तूचे उद्घाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बुधवारी हा कार्यक्रम पार पडला, हे मुख्यालय दिल्लीच्या कोटला मार्गावरच्या भूखंड क्रमांक 9 अ येथे निर्माण करण्यात आले आहे. आतापर्यंत गेली 47 वर्षे या पक्षाचे मुख्यालय 24, अकबर रोड येथे होते. या मुख्यालयाचे नाव ‘इंदिरा गांधी भवन’ असे ठेवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय मुख्यालयही या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल आणि पक्षाचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. याप्रसंगी प्रथम काँग्रेसचा ध्वजही फडकविण्यात आला. तसेच राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांचे गायन झाले. नंतर फित कापून सोनिया गांधी यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांनाही सोबत घेतले होते.
अत्याधुनिक सुविधा
हे कार्यालय अत्यंत आधुनिक सुविधांनी युक्त असे आहे. हे कार्यालय पक्षाच्या महानायकांनी घालून दिलेल्या मार्गावरुन चालणाऱ्या काँग्रेस अभियानाचे प्रतीक आहे, अशी भलावणही याप्रसंगी करण्यात आली. आता काँग्रेसला नव्या परिस्थितीप्रमाणे वाटचाल करायची आहे. हे नवे कार्यालय आम्हाला यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया अनेक उपस्थितांनी व्यक्त केली. वेणुगोपाल यांनी नव्या कार्यालयाच्या निर्मितीचा उद्देश यावेळी स्पष्ट केला.
जुने कार्यालयही राहणारच
नवे मुख्यालय निर्माण झाल्यानंतर काँग्रेसचे बहुतेक कामकाज त्यातून चालणार आहे. मात्र, जुने कार्यालय सोडले जाणार नाही. पक्षाच्या उच्चस्तरीय बैठका या जुन्या अकबर रोडवरच्या कार्यालयात होतील. अकबर रोडच्या इमारतीत 1978 पासून, म्हणजेच काँग्रेसमध्ये दुसरी फूट पडल्यापासून आणि काँग्रेस (आय) या पक्षाची स्थापना झाल्यापासून या पक्षाचे कार्यालय होते. या कार्यालयात काँग्रेसचे काही विभाग यापुढेही कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. जुन्या कार्यालयातून गेल्या 47 वर्षांमध्ये सात काँग्रेस अध्यक्षांनी काम केले आहे. या जुन्या कार्यालयात काही ब्रिटीश अधिकाऱ्यांचेही पूर्वी वास्तव्य घडले आहे.
भावना उचंबळून आल्या…
जुने कार्यालय सोडताना आमच्या भावना उचंबळून येत आहेत. नवे आधुनिक कार्यालय ही काळाची गरज असली तरी, जुन्या कार्यालयाशी काँग्रेसचा इतिहास आणि भावना जोडल्या गेल्या आहेत. म्हणूनच जुने कार्यालयही उपयोगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.
15 वर्षे चालले बांधकाम
काँग्रेसच्या या नव्या राष्ट्रीय मुख्यालयाचे बांधकाम करण्यास तब्बल 15 वर्षांचा कालावधी लागला आहे. 2009 मध्ये सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना, तसेच काँग्रेसप्रणित सरकारची सत्ता देशात असताना या बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला होता. त्याची कोनशीला सोनिया गांधी यांच्या हस्तेच बसविण्यात आली होती. बांधकामाचा खर्च 176 कोटी रुपये येईल, असे अनुमान होते. काँग्रेसच्या सत्ताकाळात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता. तो आता पूर्ण झाला आहे. नव्या काळातील पक्षाच्या सर्व आवश्यकता पूर्ण होतील आणि कार्ये सुलभपणे करता येतील, अशी या वास्तूची रचना आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
Comments are closed.