Actor Saif Ali Khan Attacked With Sharp Weapon At Home


मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर एका व्यक्तीने चाकू हल्ला केला आहे. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी (15 जानेवारी) रात्री 10 वाजता ही घटना घडली असून हल्लेखोर चोर या ठिकाणाहून फरार झाला आहे. वांद्रे पोलीस या चोराचा शोध घेत आहेत. दरम्यान, हाय सिक्युरिटी झोन असतानादेखील सैफ अली खानवर झालेल्या चाकुहल्ल्यामुळे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तसेच, याबाबत अद्याप पोलीस माहिती घेत असून त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात तपास सुरू आहे. (Actor Saif Ali Khan Attacked With Sharp Weapon At Home)

हेही वाचा : Dhananjay Munde : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीची चर्चा; परळीत मुंडे कुठे होते 

समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर खार – वांद्रे परिसरातील घरात घुसलेल्या चोराने चाकू हल्ला केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या या घरात चोर शिरला. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली आणि त्याची या चोरासोबत झटापट झाली. यावेळी चोराने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली असून यावेळी चोर तिथून पसार झाला आहे. यानंतर तत्काळ त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे.

माध्यमात आलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्याच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी छोटे ऑपरेशनदेखील केले आहे. त्यामुळे आता त्याची तब्येत ठीक असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली आहे. आधी बाबा सिद्दिकी यांची हत्या तसेच अभिनेता सलमान खान यांच्या घरावर हल्ला आणि आता चांगली सुरक्षा असतानाही सैफ अली खानच्या घरी चोराचा हल्ला यामुळे मुंबई आता सुरक्षित राहिली नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तसेच, यासंदर्भात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.



Source link

Comments are closed.