Narendra Modi inaugurates ISKCONs Sri Sri Radha Madanmohanji Temple in Kharghar
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवार (15 जानेवारी) नवी मुंबईतील खारघर येथे, इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन झाले. अशा दिव्य सोहळ्यात आपण सहभागी झालो हे आपले भाग्य असून इस्कॉनच्या संतांचा अपार स्नेह, जिव्हाळा आणि श्रील प्रभुपाद स्वामींचा आशीर्वाद आपल्याला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. (Narendra Modi inaugurates ISKCONs Sri Sri Radha Madanmohanji Temple in Kharghar)
पंतप्रधानांनी सर्व महान संतांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना नमन केले. राधा मदनमोहन मंदिराच्या वास्तूमधून अध्यात्म आणि ज्ञानाची परंपरा झळकत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे मंदिर भक्तीच्या विविध प्रकारांचे दर्शन घडवत असून ‘एकोऽहं बहुस्याम’ ही विचारधारा दर्शवत आहे, असे ते म्हणाले. नवीन पिढीच्या आकर्षणासाठी आणि त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने रामायण आणि महाभारतातील प्रसंगांवर आधारित संग्रहालय उभारण्यात येत आहे, तसेच वृंदावन मधील 12 वनांवर आधारित एक उद्यान देखील विकसित केले जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
या मंदिराचा परिसर श्रद्धेसोबतच भारताचे चैतन्य समृद्ध करणारे पवित्र केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या स्तुत्य उपक्रमासाठी त्यांनी इस्कॉनचे सर्व संतमहात्मे, सदस्य आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले. याप्रसंगी त्यांनी गोपाळ कृष्ण गोस्वामी महाराजांचे भावपूर्ण स्मरण केले, भगवान कृष्णावरील त्यांच्या अगाध भक्तीमध्ये रुजलेली महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांचे आशीर्वाद या प्रकल्पाचा अविभाज्य घटक आहेत, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – मोदींकडून महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, गावागावात डब्बा पार्टी घेण्याचा दिला सल्ला
जगभरात पसरलेले इस्कॉनचे अनुयायी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीच्या धाग्याने बांधले आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, या अनुयायांना अखंड मार्गदर्शन करणारी श्रील प्रभुपाद स्वामींची शिकवण हा त्या शृंखलेचा आणखी एक धागा आहे. श्रील प्रभुपाद स्वामींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात वेद, वेदांत आणि गीतेचे महत्त्व यांचा प्रसार केला आणि भक्तीवेदांताला सामान्य लोकांशी जोडले, असे पंतप्रधान म्हणाले. वयाच्या सत्तरीला जेव्हा आपले इतिकर्तव्य पूर्ण झाल्याची बहुतेक जणांची भावना असते, तेव्हा श्रील प्रभुपाद स्वामींनी इस्कॉन अभियानाचा प्रारंभ केला, जगभरात भ्रमंती केली आणि श्रीकृष्णाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात भगवान पोहचवला. आज जागतिक स्तरावर लाखो लोकांना त्यांच्या समर्पणाचा लाभ होत आहे, अशी भावना व्यक्त करून पंतप्रधानांनी श्रील प्रभुपाद स्वामींचे सक्रिय प्रयत्न आपल्याला सतत प्रेरणा देत असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचे अगाध ज्ञान सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे, श्रीला प्रभुपादांनी इस्कॉनच्या (ISKCON) माध्यमातून भाष्ये प्रकाशित केली आणि लोकांना त्याच्या मर्माशी जोडून, गीतेचा प्रसार केला. वेगवेगळ्या ठिकाणी आणि काळात जन्मलेल्या या संतांनी आपापल्या परीने कृष्णभक्तीचा प्रवाह पुढे नेला आहे. त्यांचा जन्मकाळ, भाषा आणि पद्धती भिन्न असूनही त्यांची समजूत, विचार आणि चैतन्य एकच होते आणि त्या सर्वांनी भक्तीच्या प्रकाशाने समाजात नवचैतन्य भरले, त्याला नवी दिशा आणि ऊर्जा दिली. त्यामुळे सेवा हा भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा पाया असून अध्यात्मात देवाची सेवा म्हणजेच जनतेची सेवा आहे, असा उल्लेख मोदींनी केला.
हेही वाचा – Aaditya Thackeray : नेत्यांच्या दौऱ्यांसाठी मुंबईकरांना का वेठीला धरता, वाहतुकीतील बदलामुळे ठाकरे भडकले
Comments are closed.