Saif Ali Khan Attacked – राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, अंबादास दानवे यांची महायुती सरकारवर टीका
राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर केली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.
अंबादास दानवे म्हणाले की, ”मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी लहान मुलींवर अन्याय होत आहेत. कोणावर चाकू हल्ले होत आहेत, कोणाची हत्या केली जात आहे. सैफ अली खान यावर जो हल्ला झाला, तो वांद्रे परिसरातील उच्चभ्रू वस्तीत झाला. येथेच बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. सलमान खानच्या घरावर याच ठिकाणी हल्ला झाला. आता स्वतः सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही. कोणीही उठून कोणत्याही गोष्टी करतं. अपहरण, चाकू हल्ले आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र सरकार अजूनही अॅक्शन मोडवर आलेलं नाही.”
दानवे पुढे म्हणाले की, ”सामान्य लोकही सुरक्षित नाही. बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. सूर्यवंशी यांना तुरुंगात मारलं. कायद्याचा धाक आणि राज्य सरकारचं कर्तव्य हे कुठेच दिसत नाही.”
Comments are closed.