मंगळूर जिल्ह्यातील बँकेवर सशस्त्र दरोडा
पिस्तूल, तलवारीचा धाक दाखवून लूट : 10-12 कोटींचा ऐवज लंपास
प्रतिनिधी/ बेंगळूर
बिदरमध्ये एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून 98 लाख रुपये लुटल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी मंगळूरच्या उळ्ळाल येथे दिवसाढवळ्या बँकेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांना पिस्तूल, तलवार, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी रोकड, सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना उळ्ळाल येथील कोटेकारु व्यवसाय सेवा सहकारी बँकेत सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 या वेळेत घडली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध जारी केला आहे.
25 ते 35 वयोगटातील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पिस्तूल, तलवार, चाकूसह इतर शस्त्रास्त्रांसह बँकेत प्रवेश केला. यावेळी पाच जणांनी तेथील कर्मचाऱ्यांना धमकावून बँकेतील रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून कारमधून पलायन केले. 10 ते 12 कोटींचा ऐवज लंपास केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
मंगळूर पोलीस आयुक्त अनुपम अगरवाल यांनी या घटनेविषयी माहिती देताना, दरोडेखोरांनी चेहऱ्यावर मास्क परिधान केला होता. ते हिंदीत संभाषण करत होते. कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांनी लूट केली. दरोडेखोर काळ्या रंगाच्या फियाट कारमधून फरार झाले. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती दिली.
एका कार्यक्रमात सहभागी झालेले विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांनी दरोड्याची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन बँक कर्मचारी व पोलिसांकडून माहिती घेतली. तसेच दरोडेखोरांना त्वरित अटक करण्याची सूचना दिली. घटनास्थळी, श्वानपथक, ठसेतज्ञ आणि उळ्ळाल पोलिसांनी भेट देऊन तपासणी केली.
Comments are closed.