752 ची सरासरी, तरीही दुर्लक्ष! करुण नायरच्या हाती पुन्हा एकदा निराशा

भारतीय फलंदाज करुण नायर सध्या खेळल्या जात असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार फलंदाजी करत आहे. नायरनं स्पर्धेतील 8 सामन्यांच्या 7 डावात 752 च्या सरासरीनं 752 धावा केल्या आहेत. यानंतर त्याला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा त्यापूर्वी होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु तसं झालं नाही.

विजय हजारे ट्रॉफीच्या 7 डावांमध्ये फलंदाजी करताना नायरनं 5 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे, यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 163 आहे. विशेष म्हणजे, 7 डावात फलंदाजी करताना नायर फक्त एकदाच बाद झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं देखील त्याच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. यानंतर त्याची किमान इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत निवड होईल, अशी अपेक्षा होती.

येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, करुण नायर 2017 पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्यानं जून 2016 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केलं होतं. यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्याला कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. कारकिर्दीतील तिसऱ्याच कसोटीत त्यानं नाबाद 303 धावा केल्या होत्या. वीरेंद्र सेहवागनंतर भारतासाठी कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो दुसराच खेळाडू होता. मात्र एक-दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर नायरला संघातून वगळण्यात आलं. तेव्हापासून तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकलेला नाही.

करुण नायरची भारतीय संघात निवड का झाली नाही? यावर स्पष्टीकरण देताना मुख्य निवडकर्ते अजित आगरकर म्हणाले, “एखाद्याची सरासरी 700 पेक्षा अधिक असेल तर ती खास कामगिरी असते. मात्र या क्षणाला त्याला या संघात स्थान मिळणं अवघड आहे.”

2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा

हेही वाचा –

Comments are closed.