चक दे इंडिया! भारताची खो-खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये एंट्री, चॅम्पियन बनण्यापासून केवळ एक पाऊल दूर
भारतानं 2025 खो-खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात, भारतीय पुरुष आणि महिला संघांनी सेमीफायनलमध्ये जोरदार विजय मिळवले आणि जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. दोन्ही संघांनी आपापल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून सातत्यानं विजय मिळवत असलेल्या भारतीय महिला संघानं उपांत्य फेरीतही आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि दक्षिण आफ्रिकेला 50 गुणांच्या फरकानं हरवून विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली. दुसरीकडे, पुरुष संघाला मात्र खूप संघर्ष करावा लागला. त्यांनी शेवटच्या वळणावर रोमांचक पुनरागमन केलं आणि विजय मिळवला.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर होणाऱ्या या विश्वचषकात शनिवारी, 18 जानेवारी रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात आला. दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. टीम इंडियानं एक दिवस आधी क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशला 109-16 अशा मोठ्या फरकानं हरवलं होतं. यावेळीही संघानं दमदार खेळ केला पण तरीही दक्षिण आफ्रिकेनं सहज हार मानली नाही.
भारतीय संघानं सामन्याची सुरुवात पहिल्याच वळणावर आक्रमणानं केली आणि त्यानंतर त्यांनी सामन्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेनं उघडपणे गुण मिळवण्याची कोणतीही संधी दिली नसली तरी, ते स्वतः जास्त गुण मिळवू शकले नाहीत. अखेर, 4 वळणे पूर्ण केल्यानंतर, भारतानं 66-16 च्या गुणांनी सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदाच्या सामन्यात भारताचा सामना नेपाळशी होईल, ज्यानी पहिल्या उपांत्य फेरीत युगांडाचा 89-18 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
महिला संघाच्या सहज विजयानंतर पुरुष संघही दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा उपांत्य सामना त्याच पद्धतीनं जिंकेल अशी अपेक्षा होती, परंतु परिस्थिती पूर्णपणे उलट असल्याचं दिसून आलं. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्याच वळणापासून भारताला अडचणीत आणलं. दुसऱ्या टर्नपर्यंत भारताकडे आघाडी होती पण तिसऱ्या टर्नमध्ये आक्रमक खेळ करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं खेळाचे चित्र पालटून टाकलं आणि 38-28 अशी आघाडी घेतली.
भारतीय संघाला पराभवाचा धोका होता आणि त्यांना त्यांच्या आक्रमणाच्या जोरावर पुनरागमन करावं लागले. येथे भारतीय खेळाडूंनी त्यांचा पूर्ण अनुभव दाखवला आणि जोरदार पुनरागमन केलं करत अखेर सामना 60-42 च्या गुणांसह जिंकला. महिला संघाप्रमाणेच पुरुष संघही अंतिम फेरीत नेपाळशी सामना करेल.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफी; हार्दिकचा सहाय्यक म्हणून बुमराह, शुभमन गिल?
जसप्रीत बुमराहचे चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणे नाही निश्चित! रोहित शर्माचे मोठे वक्तव्य
Champions Trophy; ‘या’ 3 कारणांमुळे मोहम्मद सिराजला भारतीय संघातून वगळले
Comments are closed.