करुण नायरची संघात निवड न झाल्याने माजी खेळाडूचा संताप, बीसीसीआयला सुनावले!

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करेल, तर विराट कोहलीनंही आपलं स्थान सुरक्षित ठेवलं आहे. जसप्रीत बुमराहचा संघात समावेश करण्यात आलाय, परंतु त्याच्या खेळण्याबाबत अजूनही निश्चितता नाही.

भारतीय संघात एका खेळाडूची निवड न झाल्यानं सध्या सोशल मीडियावर वातावरण गरम आहे. या खेळाडूचं नाव आहे करुण नायर. माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी करुण नायरची निवड न झाल्यानं संताप व्यक्त केला आहे. अंतिम सामन्यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये नायरनं फक्त 7 डावात 752 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याची सरासरी चक्क 752 एवढी होती!

हरभजन सिंगनं सोशल मीडियाद्वारे संघ निवडीवर संताप व्यक्त केला. त्यानं लिहिलं, “जर तुम्ही फॉर्म आणि कामगिरीच्या आधारे संघ निवडत नसाल तर देशांतर्गत क्रिकेटचा काय अर्थ आहे?” करुण नायर काही काळापूर्वी विदर्भ संघात सामील झाला होता. त्यानं तेथे येताच धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. संपूर्ण स्पर्धेत नायरनं 8 डावात 779 धावा केल्या, ज्यात 5 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. या शानदार कामगिरीनंतरही निवड समितीनं मधल्या फळीत श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि रिषभ पंत यांना संधी देण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी पत्रकार परिषद झाली तेव्हा टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी करुण नायरच्या कामगिरीचं कौतुक केलं. पण त्याच वेळी त्यांनी असंही म्हटलं की संघात प्रत्येक खेळाडूला स्थान देणं खूप कठीण आहे. ते म्हणाले, “माझ्या मते, करुण नायरनं खरोखरच खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यानं अशी कामगिरी केल्यानंतर मी त्याच्याशी बोललो, पण सध्याच्या संघात स्थान मिळवणं त्याच्यासाठी खूप अवघड आहे.”

हेही वाचा –

हर्टब्रेक! अंतिम सामन्यात करुण नायरच्या संघाचा पराभव, पहिलं विजेतेपद हुकलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निवड झाल्यानंतर रिषभ पंतला मिळाली आणखी एक मोठी जबाबदारी, लवकरच होईल घोषणा
जसप्रीत बुमराहचे चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणे नाही निश्चित! रोहित शर्माचे मोठे वक्तव्य

Comments are closed.