प्रथम – शिवाचा किल्ला! मुंबईतील 350 वर्षीय पुरणपुरुष
>> प्रांजल वाघ
1665 साली पोर्तुगीजांनी हुंडय़ात हा सात बेटांचा समूह इंग्रजांच्या ताब्यात दिला. याच बेटांतील ‘परळ’ या बेटाचं उत्तर टोक म्हणजे ‘शीवचा दुर्ग’ – मुंबईच्या उत्तरी सीमेचा रक्षणकर्ता आणि एकमेव असा ‘गिरिदुर्ग’! ‘शीव’ म्हणजे सीमा किवा वेस! ‘सायन’ हा शीवचा पोर्तुगीज अपभ्रंश! पुढे 1733-39 असे दीर्घकालीन युद्ध करून चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचं नामोनिशाण उत्तर फिरांगाणातून मिटवून टाकलं. दीव-दमण ते आजचं वांद्रे-ठाणे-उरण इथपर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडल्या! इंग्रजांनी मराठय़ांच्या भीतीने मुंबईतील सर्व कोटांची डागडुजी करून ते मजबूत करून घेतले. त्यात शीवच्या दुर्गावर 32 सैनिक व त्यांचा एक म्होरक्या असे कायम केले.
सोळाव्या शतकात बिंबस्थान म्हणजे मुंबई आणि साष्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली. थेट दीव-दमण ते चौलपर्यंत पोर्तुगीजांची क्रूर सत्ता या परिसरात थैमान घालू लागली. पुढे 1665 साली पोर्तुगीजांनी हुंडय़ात हा सात बेटांचा समूह इंग्रजांच्या ताब्यात दिला. याच बेटांतील ‘परळ’ या बेटाचं उत्तर टोक म्हणजे ‘शीवचा दुर्ग’ – मुंबईच्या उत्तरी सीमेचा रक्षणकर्ता आणि एकमेव असा ‘गिरिदुर्ग’!
‘शीव’ म्हणजे सीमा किवा वेस! ‘सायन’ हा शीवचा पोर्तुगीज अपभ्रंश! पोर्तुगीजांनी आपल्या राजवटीत ही टेकडी तटा-बुरुजांनी मजबूत करून घेतली होती, पण मुंबईचे पहिले गव्हर्नर – जेराल्ड ऑन्जियर यांनी खऱया अर्थाने हा किल्ला साधारण 1665-1671च्या आसपास बांधून काढला. जवळच एका टेकडीवर ‘रिवा’ नामक एकांडा बुरूज बांधून काढला गेला.
पुढे 1733-39 असे दीर्घकालीन युद्ध करून चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचं नामोनिशाण उत्तर फिरांगाणातून मिटवून टाकलं. दीव-दमण ते आजचं वांद्रे-ठाणे-उरण इथपर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडल्या! इंग्रजांनी मराठय़ांच्या भीतीने मुंबईतील सर्व कोटांची डागडुजी करून ते मजबूत करून घेतले. त्यात शीवच्या दुर्गावर 32 सैनिक व त्यांचा एक म्होरक्या असे कायम केले. किल्ला तोफांनी सज्ज केला गेला. किल्ल्यावर या सैनिकांची राहण्याची सोय, शौचालय, दारू कोथर इत्यादी वास्तू होत्या. त्यांचे अवशेष आजही दिसतात. किल्ल्यावर पाण्याची दोन बांधून काढलेली टाकीदेखील आढळतात. इथे आजही एक तोफ आहे.
पुढे पुढे जशी मराठी ताकद कमी होत गेली तसं इंग्रज हळूहळू खाडी ओलांडून मराठय़ांचा प्रदेश जिंकू लागले. 1818 मध्ये मराठेशाही खालसा झाल्यावर इंग्रजांना भारतात कोणी शत्रू उरलाच नाही आणि या किल्ल्याचं महत्त्व अस्तास जाऊ लागलं. भराव टाकून खाडी भरली, मुंबईच्या सीमा विस्तारल्या. मग विमाने आली, क्षेपणास्त्रs आली आणि किल्ले कालबाह्य होऊ लागले. मुंबईच्या झपाटय़ाने होणाऱया शहरीकरणात, भयंकर वेगवान जीवनात पैसा आणि प्रगतीच्या मागे हात धुऊन लागलेल्या माणसाने आपल्या फायद्यासाठी निसर्गाच्या आणि मानवतेच्या ऱहासाच्या साऱया सीमा पार केल्या तिथे या लहानग्या ‘शीव’च्या किल्ल्याची काय बात करता?
2025 सालचा पहिला सूर्योदय या किल्ल्यावरून पाहताना सहज म्हणून उत्तरेकडे नजर फेकली. प्रदूषणयुक्त धुके अर्धवट झोपेत असलेल्या मुंबईवर गोधडीसारखे पसरले होते. राहून राहून वाटत होते, जर 1739 मध्ये मराठय़ांनी खाडी ओलांडून इंग्रजांपासून मुंबई मुक्त केली असती तर आज देशाचा इतिहास वेगळा असता! पण इतिहासात ‘जर-तर’ला जागा नसते.
‘आय लव्ह यू’ खरडलेल्या भिंती, कोपऱयात एकमेकांच्या मिठीत हरवलेली प्रेमी युगुले, रील्स बनवण्यात खर्ची पडणारी पिढी माझे लक्ष वेधून घेत होती. इतिहासाबद्दल असलेली आस्था पाहून मन खिन्न झाले. गगनचुंबी इमारतींच्या वेढय़ात अडकलेल्या, कालबाह्य म्हणून निरुपयोगी ठरवून अडगळीत टाकलेल्या या 350 वर्षीय पुराणपुरुषाचा निरोप घेऊन मी नवीन वर्षात घडय़ाळाच्या काटय़ावर धावणाऱया असंख्य मुंबईकरांच्या गर्दीत सामील झालो!
Comments are closed.