राजनाथ सिंह यांनी संगममध्ये स्नान केले
प्रयागराजमध्ये सैन्याधिकाऱ्यांसमवेत बैठक, संतांचीही घेतली भेट
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तर प्रदेशातील महाकुंभाच्या सहाव्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दुपारी संगमात डुबकी मारली. त्यांनी वैदिक मंत्रांच्या जपात स्नान केले. याप्रसंगी मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी हेदेखील उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी या भेटीदरम्यान संत आणि ऋषींची भेट घेतली. तसेच लष्करी अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेतली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या आगमनापूर्वी सैन्याने संपूर्ण किला घाटाचा ताबा घेतला होता. स्निफर डॉग आणि बॉम्ब स्क्वॉडने तपास केला. मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी यांनी बामरौली विमानतळावर राजनाथ सिंह यांचे स्वागत केले. यानंतर राजनाथ सिंह महाकुंभमेळा परिसरात पोहोचले. प्रयागराजमध्ये आतापर्यंत 7.5 कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. तसेच शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत दिवसभरात 31 लाख भाविकांनी स्नान केल्याची नोंद झाली होती.
संगमात आंघोळ हेच माझे नशीब : राजनाथ सिंह
संगममध्ये स्नान केल्यानंतर राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देवाने मला ही संधी दिली हे मी माझे भाग्य मानतो. हा उत्सव म्हणजे भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचा आध्यात्मिक अनुभव आहे. हा सोहळा प्राचीन वैदिक खगोलीय घटनेवर आधारित आहे. हे ठिकाण गंगा, यमुना आणि सरस्वती यांचे संगम आहे. तसेच सनातन धर्माचे अध्यात्म आणि वैज्ञानिक पैलू तसेच सामाजिक सौहार्दाचेही प्रतीक आहे. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अभिनंदनास पात्र आहेत, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.