मनू भाकरवर कोसळला दु:खाचा डोंगर, भीषण अपघातात मामा आणि आजीचा जागीच मृत्यू

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भीषण रस्ते अपघातामध्ये तिच्या मामाचा आणि आजीचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास हरयाणातील चरखी दादरी जवळील महेंद्रगड बायपास रोडवर हा अपघात झाला. मनू भाकरचे मामा आणि आजी स्कूटरवर जात असताना भरधाव वेगात झालेल्या ब्रेझा कारने त्यांना उडवले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वीच मनू भाकर हिचा ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिने हा पुरस्कार स्वीकारला होता. अशातच तिच्या मामा आणि आजीचा अपघातात मृत्यू झाल्याने मनू भाकर आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत ब्रेझा गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी मनू भाकर हिच्या मामा आणि आजीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून कारचालकाचा शोध सुरू आहे.

दरम्यान, पॅरीस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर हिने दोन पकदं जिंकण्याचा कारनामा केला होता. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र आणि 10 मीटर एअर पिस्तूल महिला गटात मनूने कांस्यपदकाची कमाई केली होती. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला खेळाडू ठरली होती.

Comments are closed.