संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीतून का वगळण्यात आलं? खरं कारण जाणून घ्या
चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेत भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आहे. या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा 18 जानेवारी रोजी करण्यात आली. मात्र या संघात यष्टीरक्षक संजू सॅमसनचं नाव नसल्यामुळे सर्व चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
या सगळ्यामध्ये बोललं जातंय की, विजय हजारे ट्रॉफीकडे दुर्लक्ष करणं हे संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातून वगळण्याचं कारण आहे. यावर केरळ क्रिकेट असोसिएशन (केसीए) चे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी मोठा खुलासा केला. 2024-25 विजय हजारे ट्रॉफीसाठी संजू सॅमसन केरळच्या संघात का नव्हता हे त्यांनी सांगितलं.
या विषयावर बोलताना केरळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश जॉर्ज म्हणाले, संजू सॅमसननं एका ओळीच्या संदेशाद्वारे विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याच्या अनुपस्थितीची माहिती दिली होती. जॉर्ज म्हणाले, “संजू सॅमसननं आम्हाला एका ओळीच्या मजकूराद्वारे सांगितलं की तो 30 सदस्यांच्या सराव शिबिराला उपस्थित राहणार नाही. हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता आणि नंतर त्यानं निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं.”
ते पुढे म्हणाले, “आम्हाला नेहमीच असं वाटत होतं की सॅमसन संघाचा कर्णधार होण्यासाठी परिपूर्ण आहे. तो आमचा व्हाईट-बॉल कर्णधार आहे. त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही कर्णधारपद भूषवलं होतं. परंतु त्याचा स्वभाव असा आहे की, तो तेव्हाच उपलब्ध असतो जेव्हा त्याचं मन असतं. यामुळे निवड प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.”
गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. येथे दोन्ही संघांमध्ये 4 टी20 सामन्यांची मालिका खेळण्यात आली. या मालिकेत संजू सॅमसन दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. सॅमसननं 4 सामन्यांमध्ये 72 च्या सरासरीनं 216 धावा केल्या होत्या. या टी20 मालिकेत सॅमसनने 2 शतकंही केली होती.
2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा
हेही वाचा –
लज्जास्पद! अवघ्या 23 धावांवर संपूर्ण संघ ऑलआऊट, 6 फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही
खूप झाला आराम…रोहित, जडेजासह हे खेळाडू रणजी ट्रॉफी खेळणार; कोहली अजूनही विश्रांतीवर
धक्कादायक! भारतीय क्रिकेटमध्ये हे काय चाललंय? उपकर्णधारावरून बैठकीत गोंधळ
Comments are closed.