आयकर आणि ईडीला वाल्मीक कराडचा तपास करावासा नाही वाटत का? अंबादास दानवे यांचा सवाल
वाल्मीक कराडकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचं समोर येतंय, मग आयकर आणि ईडी वाल्मीक कराडचा तपास का नाही करत असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच यात सरकार काहीतरी लपवून ठेवतंय असं लोकांना वाटतंय असेही दानवे म्हणाले.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, न्याय मागण्यासाठी मोर्चा काढावा लागणे हे दुर्दैवी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 40 दिवस झाले. वाल्मीक कराडवर 302 चा गुन्हा दाखल होऊन मोक्का लागला. पण दररोज नवीन बातम्या येत आहेत की त्यांची मुंबई पुण्यात किती संपत्ती आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना आयकर आणि ईडीला वाटलं नाही का या आर्थिक बाबींचा तपास व्हावा. वाल्मीक कराडकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती कुठून आली? ही संपत्ती इतरांच्या नावावर झाली ते कोण होते? असा सवाल दानवे यांनी विचारला.
तसेच वाल्मीक कराड बाबत सरकार पक्षपातीपणा करत आहे. धनंजय मुंडे जवळचा सहकारी असल्याने त्याला वेगळ्या पद्धतीचा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय. वाल्मीक कराडकडे एवढं घबाड सापडलं असताना एकही आयकरचा अधिकारी त्यांच्याकडे गेला का? बाकी पाच ते दहा लाख रुपये इथे तिथे गेले की ईडीची लगेच नोटीस येते. याबाबतीत सरकार अजूनही काही गोष्टी लपवत आहे असे लोकांना वाटतं असेही दानवे म्हणाले.
Comments are closed.