हुमनाबादमध्ये एअर बलूनला अपघात
जलसंगी ग्रामस्थांमध्ये खळबळ : हवामानाच्या अध्ययनासाठी हैदराबादेतून उडविले होते
प्रतिनिधी/ बेंगळूर
स्थानिक हवामानासंबंधी अभ्यास करण्यासाठी आकाशात उडविण्यात आलेले एअर बलून शनिवारी सकाळी बिदर जिल्ह्याच्या हुमनाबाद तालुक्यातील जलसंगी येथे कोसळले. तांत्रिक उपकरण असणारी वस्तू अचानक आकाशातून कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
हैदराबादच्या टीआरएफआर बलून केंद्रातून 17 जानेवारी सदर सॅटेलाईट पेलोड बलून उडविण्यात आले होते. तांत्रिक दोषामुळे शनिवारी ते हुमनाबाद तालुक्यातील जलसंगी येथे कोसळले आहे. मात्र, या घटनेत कोणतीही अनुचित घटना किंवा हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. एअर बलून कोसळताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने जलसंगी गावाला भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक उपकरण असणारे सॅटेलाईट पेलोड बलून स्थानिक हवामानाचे अध्ययन करण्यासाठी हैदराबादमधील टीआयएफआर (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) बलून केंद्रातून 17 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता उडविण्यात आले होते. शनिवारी सकाळी 6 च्या सुमारास जलसंगी गावात कोसळले.
बलूनला तांत्रिक उपकरण जोडलेले असल्याने त्याचा ठावठिकाणा शोधत टीआयएफआर केंद्राचे अधिकारीही तेथे पोहोचले. त्यांनी उपकरणाविषयी स्थानिकांना माहिती देऊन भीती बाळगण्याची गरज नसल्याचे सांगितले. असे बलून जानेवारी ते एप्रिल आणि ऑक्टोबर ते डिसेंबर असे वर्षातून दोनदा उडवून वातावरणातील बदलासंबंधी अध्ययन केले जाते, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
Comments are closed.