वाळूचे ट्रक, क्रशर चालू द्या; सगळे आपलेच लोक आहेत! राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणत्याही योजनेत दोन-पाच टक्के भ्रष्टाचार होतोच असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अवैध वाळूउपसा करणाऱ्यांची पाठराखण केली आहे. वाळूचे ट्रक, खडी क्रशरच्या गाड्या चालू द्या. त्यांना पकडू नका. काही फरक पडत नाही. सगळी आपलीच लोकं आहेत, असे विधान विखे-पाटील यांनी केले आहे.

सोलापूर जिल्हयात एका कार्यक्रमात बोलताना विखे-पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. 2022-2024 या काळात ते महसूलमंत्री होते. सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे होते. याचा संदर्भ देऊन विखे-पाटील म्हणाले, पालकमंत्री असताना वाळू, खडी क्रशरच्या गाड्या पकडल्याचे सतत ऐकावं लागायचं. पण सोलापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहीतच आहे. वाळूचे ट्रक, खडी क्रशरच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जरी असले तरी शेवटी मागे त्यांना मी सांगितले होते दुर्लक्ष करा, गाड्या चालू द्या, काय फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत.

टीकेनंतर सारवासारव

विखे-पाटील यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर विखे-पाटील यांनी सारवासारव केली. सर्वच गोष्टी गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गमतीने बोललो. तसेच नदीतून वाळू काढण्यास आपला कायम विरोध आहे, असे विखे-पाटील म्हणाले.

Comments are closed.