बाप मुलीचे लैंगिक शोषण करणार नाही, पण चुका घडू शकतात; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
बाप-लेकीच्या पवित्र नात्याला अनुसरून मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण मत नोंदवले आहे. कुठलाही बाप आपल्या मुलीचे लैंगिक शोषण करणार नाही. किंबहुना मुलगी आपल्या जन्मदात्या पित्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करणार नाही. परंतु, मानवी मानसशास्त्र विचारात घेता चुका घडू शकतात, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 43 वर्षीय आरोपी पित्याची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला.
न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे की, सामान्य परिस्थितीत मुलगी तिच्या पित्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावत नाही. त्याचप्रमाणे सामान्य परिस्थितीत पितादेखील स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार नाही. तथापि, मानवी मानसशास्त्र आणि प्रवृत्ती लक्षात घेता प्रसंगी चुका होऊ शकतात. मुलांचे सामान्य तारणहार असलेल्या पित्याच्या हातूनही चुका घडू शकतात.
आरोपी पित्याला स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार पित्याला दोषी ठरवले होते आणि 10 वर्षांच्या तुरुंगवासासह 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तो निर्णय रद्द करीत न्यायमूर्ती सानप यांनी पित्याला निर्दोष मुक्त केले.
Comments are closed.