आयपीएल 2025पूर्वी केकेआरचे वाढले टेन्शन, सर्वात महागड्या खेळाडूला झाली दुखापत!

यंदाच्या आयपीएल (IPL 2025) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. आयपीएलचा आगामी हंगाम (21 मार्च) पासून सुरू होईल आणि फायनल सामना (25 मे) रोजी खेळवला जाईल अशी घोषणा आधीच करण्यात आली आहे. पण त्याआधीच कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मोठा धक्का बसला आहे. कोलकाताचा सर्वात महागडा खेळाडू, व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer), रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे. अय्यर हा स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो आणि केरळविरुद्धच्या सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली.

केरळविरूद्धच्या सामन्यात मध्य प्रदेश संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. खरे तर, मध्य प्रदेश संघाने 17.2 षटकांत 49 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. त्याने डावात फक्त 3 चेंडू खेळले होते, पण नंतर फलंदाजी करताना त्याचा घोटा मुरगळला. अय्यर वेदनेने ओरडत जमिनीवर पडला. दरम्यान फिजिओलाही बोलावण्यात आले. काही वेळाने इतरांच्या मदतीने, तो मैदानाबाहेर पडला. त्याला रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आले.

सामना सुरूच राहिला आणि व्यंकटेश अय्यर डगआउटमध्ये पॅड घालून आणि दुखापतग्रस्त पाय खुर्चीवर ठेवत बसलेला दिसला. केकेआरसाठी हा मोठा धक्का आहे, कारण कोलकाताने व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) आयपीएल 2024 मध्ये केकेआरसाठी खेळताना 13 डावांमध्ये 46.25च्या प्रभावी सरासरीने 370 धावा केल्या होत्या. त्याने 158 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि हंगामात एकूण 4 अर्धशतके झळकावली.

व्यंकटेश अय्यरच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत 50 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 31.57च्या सरासरीने फलंदाजी करताना 1,326 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 137.13 राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याने 11 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. तर आयपीएलमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 104 आहे.

अधिक वाचा-

रवींद्र जडेजाचा रणजी स्पर्धेत धुमाकूळ, पंजा उघडत रिषभ पंतच्या संघाचं कंबरडा मोडला
कर्णधारपदात उत्तीर्ण, पण फलंदाजीत आलेख घसरला, नेतृत्व स्वीकारल्यापासून सूर्याच्या कामगिरीत घट
Ranji trophy; दिग्गज खेळाडूंनी भरलेली मुंबई अवघ्या 120 धावांत सर्वबाद, जम्मू काश्मीरची शानदार गोलंदाजी

Comments are closed.