पडघ्यातील कुख्यात गुंडावर हद्दपारीची कारवाई; भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांचे आदेश
ठाणे : भिवंडी तालुक्यातील पडघा येथील कुख्यात गुंड वाहिद नजीर चिखलेकर (रा. राहुर,भिवंडी) याच्यावर भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहिद चिखलेकर याने भिवंडीसह पडघा परिसरात दहशत पसरवली असून त्यांच्यावर 2004 ते 2023 पर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 6 दखलपात्र आणि 1 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 6 गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. यासह वाहिदच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात सीआरपीसी कलम 107 अन्वये 2 आणि 110 अन्वये असे 3 गुन्हे दाखल आहेत.
या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या 8 जानेवारी 2024 च्या शिफारसीनुसार उपविभागीय अधिकारी सानप यांनी निवडणुकीच्या व्यस्ततेतून मुक्त झाल्यानंतर 21 जानेवारी 2025 रोजी वाहिदवर ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर व नाशिक जिल्ह्यातून रोजी 2 वर्षांकरिता हद्दपारची कारवाई केली आहे.
दरम्यान याबाबतची प्रत पोलिस अधिक्षक ठाणे (ग्रामीण),उपविभागीय पोलिस अधिकारी गणेशपुरी विभाग आणि पडघा पोलिस ठाण्याचे वपोनि यांनाही पाठवण्यात आली आहे. त्यातच हद्दपार इसम वाहिदने ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर व नाशिक जिल्ह्याच्या बाहेर गेल्यापासून अथवा त्याला हद्दपार केल्यापासून पुढील एक वर्षाच्या कालावधीपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी भिवंडी विभाग अथवा शासनाच्या लेखी परवानगीशिवाय ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगरे आणि नाशिक जिल्ह्यात प्रवेश करु नये असा आदेश आहे.
हा आदेश अंमलात असेपर्यंत वाहिदने हद्दपार केलेल्या जिल्ह्या व्यतिरीक्त महाराष्ट्र राज्यात जेथे कोठे रहिवास करत असेल, त्या रहिवासाजवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये महिन्यातून एकदा हजेरी देणे बंधनकारक असणार आहे. तसेच वाहिद महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाणार असल्यास राज्याबाहेर गेल्यापासून 10 दिवसाच्या आत त्याने त्याच्या जाणेबाबत नजिकच्या प्रभारी पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक असेल.
राज्याबाहेरून परत आल्यावरही याबाबत त्याने नजिकच्या प्रभारी पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे पडघा पोलीस निरीक्षकांनी सदर आदेशाची कोटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी असे शेवटी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांत अधिकाऱ्यांनी वाहिदवर तडीपारीचे आदेश देताच तो फरार झाला असून पडघा पोलिस त्याचा शिताफीने शोध घेत आहेत.
Comments are closed.