38th National Games – तापाने फणफणला मात्र हार मानली नाही, नाशिकच्या पठ्ठ्याने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले कांस्यपदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या नाशिकच्या साईराज परदेशी याने आजारपणावर मात करत प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर वेटलिफ्टिंग मधील 81 किलो गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याचे हे पहिलेच कांस्यपदक असून कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एक आठवड्यापूर्वी तापाने आजारी असलेल्या आणि पाठीतील दुखण्याने त्रस्त असलेला साईराज स्पर्धेत सहभागी होईल का नाही? याबाबत शंका निर्माण केली जात होती. परंतु त्याने सर्वांना चुकीचे ठरवले आणि आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरला. 17 वर्षीय साईराजने स्नॅचमध्ये 141 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 170 किलो असे एकूण 311 किलो वजन उचलत कांस्यपदकाची कमाई केली आहे. तसेच मध्यप्रदेशच्या व्ही. अजय बाबू याने 322 किलो तर पश्चिम बंगालच्या अचिंता शेऊली याने 313 किलो वजन उचलून अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्यपदकाची कमाई केली.

साईराज याने डिसेंबर महिन्यात झालेल्या कनिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही त्याला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, एक आठवड्यापूर्वी त्याला ताप आला होता तसेच पाठीतही उसण भरली होती. तथापि पतियाळा येथे राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात (NCOE) प्रशिक्षक अल्केश बारूआ यांनी साईराज याला मोलाचे सहकाऱ्य केले. त्यामुळेच तो स्पर्धेत सहभागी झाला आणि महाराष्ट्राच्या खात्यात त्याने आणखी एका पदकाची भर घातली. साईराजने खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा, विविध वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत.

“आजारपणामुळे या स्पर्धेत सहभागी होईल की नाही याबाबत साशंक होतो. तथापि माझे प्रशिक्षक अल्केश बारूआ यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी येथे सहभागी झालो आणि कांस्यपदकापर्यंत पोहोचलो. हे कास्यपदक माझ्यासाठी आगामी करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे असे.” साईराज याने सांगितले.

Comments are closed.