38th National Games – आर्या-रुद्राक्ष जोडीचा रूपेरी वेध, स्पर्धेत पटकावले सलग दुसरे पदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरले व रुद्रांक्ष पाटील यांनी चमकदार कामगिरी करत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. नेमबाजी मधील 10 मीटर रायफल मिश्र दुहेरीत रौप्य पदक पटकावले आहे. यापूर्वी त्यांनी वैयक्तिक विभागातही रौप्य पदक पटकावले होते. त्यांचे या स्पर्धेतील हे सलग दुसरे रुपेरी यश आहे.
महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजवर रंगलेल्या 10 मीटर रायफल मिश्र दुहेरीच्या लढतीत आर्या-रुद्रांक्ष या जोडीने पंजाबच्या ओजस्वी ठाकूर व अर्जुन बबुटा या जोडीला कडवी झुंज दिली. मात्र, पंजाबच्या जोडीने महाराष्ट्राच्या जोडीवर 16-12 असा विजय संपादन करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आर्या हिने याआधी या स्पर्धेतील दहा मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले होते. रुद्राक्ष यानेही याच क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले होते.
पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करीत महाराष्ट्राने अंतिम फेरीत धडक मारली होती. सुरूवातीला महाराष्ट्राने अंतिम लढतीत पंजाबविरूद्ध दमदार नेमबाजीचे प्रदर्शन घडवले. 6-2 गुणांची आघाडी घेतल्यानंतर 8 व्या फेरीत पंजाबच्या जोडीने अचूक नेमबाजी करीत 10-10 असा अचूक नेम साधत महाराष्ट्राला मागे टाकले. अखेरच्या फेरीत आर्या व रुद्रांक्ष दबावाखाली खेळल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
आर्या ही 22 वर्षीय खेळाडू सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) खेलो इंडिया शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नवी दिल्ली येथे मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती नाशिकची असून तेथे एचपीटी महाविद्यालयात कला शाखेत ती शिकत आहे. मुंबई येथे स्नेहल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणार्या रुद्राक्ष याने जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवीत गतवेळी ऑलिंपिक कोटा मिळविला होता. त्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत.
Comments are closed.