Raj Thackeray commented on the issue of Marathi language at the World Marathi Literature Conference


पुणे : याठिकाणी तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आज समारोप होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी समारोप कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावर भाष्य केले. आपणच आपली भाषा वृद्धिंगत करायला हवी, असे भाष्य त्यांनी केले. (Raj Thackeray commented on the issue of Marathi language at the World Marathi Literature Conference)

भाषणाला सुरुवात केल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या मनात प्रश्न असू शकतो की, मी इथे कसा आलो? पण उदय सामंत यांनी मला बरीच गळ घातली आणि या कार्यक्रमासाठी बोलावलं, म्हणून मी इथे आलो. पण इथे आल्यावर  माझे मित्र रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ही सगळी भाग्यवान माणसं आहेत. कारण त्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो. तो घेऊन आम्हाला वाटचाल करावी लागते. यासाठी आपणच आपल्या भाषेवरती ठाम राहिले पाहिजे, तरच जग आपल्याला दाद देतात, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा – Maharashtra Politics : शरद पवारांना पुन्हा धक्का, या आमदाराची होणार अजित पवार गटात घरवापसी

राज ठाकरे म्हणाले की, इतर देशांमधील माणसं आपल्या भाषेशी इतके प्रामणिक असतात की, त्यांचा तुम्हाला अभिमान वाटायला लागतो. जर बाकीचे आपल्या भाषेबद्दल इतका अभिमान बाळगत असतील तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलायला जातो? आपल्याकडील मुले- मुली हिंदी इंग्रजीमध्ये बोलायला जातात, ते कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले की, आता इथे जय जय महाराष्ट्र माझा गाणं लागलेलं होतं. भारतामध्ये कुठल्या राज्याचे असे राज्यगीत आहे? कोण म्हणत जय जय आसाम माझा, जय जय गुजरात माझा, फक्त आपणचं जय जय महाराष्ट्र माझा बोलतो. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, या हिंदप्रांतावर सगळी आक्रमण बाहेरून झाली. या भागावर राज्य फक्त मराठ्यांनी केले, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषा मंत्र्यांनी मराठीसाठी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र जे जे आम्ही करू, त्यालाही पाठिंबा द्यावा. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. आतापर्यंतचा अनुभव सांगितला, बाकी काही नाही, अशी मिश्किल टिप्पणी करत राज ठाकरे म्हणाले की, मी जे करतोय ते महाराष्ट्रासाठी, बाकी कशासाठी नाही. मराठी भाषेबरोबरच मराठी माणसांचे अस्तित्वही टिकले पाहिजे. तो टिकला तरच मराठी भाषा टिकेल. त्यामुळे माझी साहित्यिकांना विनंती आहे, त्यांनी मराठी भाषेबद्दल बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. पूर्वी साहित्यिक बोलायचे आणि राजकीय विषयावर आपले मत मांडायचे. मात्र आता तशा गोष्टी दिसत नाहीत. त्यामुळे साहित्यिकांनी बोललं पाहिजे. चांगलं काय, वाईट काय हे सांगितलं पाहिजे. साहित्यिक बोलायला लागतील तेव्हा माणसं ऐकायला लागतील, असे आवाहनही राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांना केले.

हेही वाचा – Arjun Khotkar : राजकीय भूकंप काय असतो हे दाखवून देऊ, अर्जुन खोतकरांचा रोख कोणाकडे?



Source link

Comments are closed.