फडणवीसांचे धक्क्यावर धक्के; मिंधेंच्या मंत्र्यांचा खासगी सचिव नेमण्याचा अधिकारही काढला! ऑफिस मिळाले, पण अजूनही पीए नाही
>> राजेश चुरी
महायुतीचे सरकार आले तरी मनासारखी मंत्रीपदे न मिळाल्याने मिंधे गटामध्ये अस्वस्थता आहे. त्यातच आता मंत्र्यांना खासगी सचिव (पीए) नेमण्याचा अधिकारही काढून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाला धक्का दिला आहे. मिंधे गटाच्या बारा मंत्र्यांपैकी फक्त तिघांनाच खासगी सचिव देण्यात आले आहेत. इतर मंत्री अजूनही खासगी सचिवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मिंधे गटाची भाजपविरोधातील नाराजी आणखीनच वाढली आहे.
भाजपच्या मंत्र्यांना पीए-पीएस किंवा ओएसडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ग्रीन सिग्नल’शिवाय मिळणार नाही. मिंधे गटाच्या मंत्र्यांचे पीए नियुक्त करण्याचे अधिकारही फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आतापर्यंत एक पीएस आणि एक विशेष कार्य अधिकारीच मिळाला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनाच अद्याप खासगी सचिव आहेत. मिंधे गटाचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराज देसाई, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांना अद्याप पीए दिलेले नाहीत. त्यामुळे मंत्र्याकडील फायली पडून राहण्यास सुरुवात झाली आहे
सुपर क्लास वन अधिकारी अस्वस्थ
मंत्र्यांचे पीए हे शासकीय सेवेतील सुपर क्लास वन अधिकारी असतात. पण मंत्री कार्यालयात त्यांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांच्या मुलाखती आता मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अतुल वझे घेत आहेत. आम्हाला संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची कल्पना आहे. पण पक्ष संघटनेतील एक व्यक्ती मंत्र्यांकडील नियुक्तीबाबत आपले भवितव्य ठरवणार यावरून या क्लास वन अधिकाऱयांमध्ये अस्वस्थता आहे.
बंगल्याऐवजी फ्लॅट
सनदी अधिकारी म्हणून सरकारी सेवेतून निवृत्त झालेले लाडके ‘मित्र’ असलेल्या अधिकाऱयांना शासकीय बंगले देण्यात आले आहेत, पण मिंधेंच्या मंत्र्यांना मलबार हिल आणि चर्चगेट परिसरातील इमारतीमधील फ्लॅट दिले आहेत. सरकारी बंगल्याऐवजी फ्लॅटवर बोळवण केली आहे. त्यामुळेही मिंधे गटात प्रचंड नाराजी आहे.
Comments are closed.