Clear Rs 89k cr pending dues contractors warn of stopping work from feb 5 in marathi


Maharashtra Government News : मुंबई : प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसा जमा करत त्यांना तर खुश केले. पण, त्याचवेळी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडल्याचे दिसते आहे. कारण, राज्यातील विविध विभागांतर्गत काम करणारे ठेकेदार हे अत्यंत नाराज आहेत. या ठेकेदारांना जवळपास 89 हजार कोटी रुपये देणे बाकी आहेत. अनेक महिन्यांपासून या पैशांची वाट पाहणाऱ्या ठेकेदारांच्या संघटनेने आता सरकारला काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. (clear Rs 89k cr pending dues contractors warn of stopping work from feb 5)

जवळपास 8 महिन्यांपासून या पैशांची वाट पाहणाऱ्या ठेकेदारांनी लवकरात लवकर आपल्या मागण्या पूर्ण करण्यास सरकारला सांगितले आहे. अन्यथा 5 फेब्रुवारीपासून आपण काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा या ठेकेदारांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी यासंदर्भात सरकारला सरकारला पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी सरकार मोफत वस्तू वाटण्याच्या मागे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जुलै 2024 पासून या ठेकेदारांचे पैसे प्रलंबित आहेत.

हेही वाचा – Jitendra Awhad : धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, आव्हाडांची खोचक टीका

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेने (MSCA) यापूर्वी देखील 14 जानेवारी 2025 रोजी सरकारला यासंदर्भात एक पत्र पाठवले होते. त्या पत्रानंतरही सरकारने आमच्या पैशांची कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे या संघटनेने पुन्हा नव्याने 30 जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील या मंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. असेच एक पत्र राज्य अभियंता संघटनेने देखील पाठवले आहे.

राज्य सरकारकडून आम्हाला जुलै 2024 पासून निधी मिळालेला नाही. आम्ही सातत्याने सरकारसमोर हा विषय मांडतो आहोत, पण कोणत्याही आश्वासनाशिवाय आम्हाला बाजूला सारले जात आहे. पैसा मिळाल्याशिवाय कोणताही ठेकेदार कसा काम करेल, असा सवालही त्यांनी विचारला आहे. त्यामुळेच आम्ही 5 फेब्रुवारीपासून काम थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे MSCA चे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले आहे. यासंदर्भात राज्यभरातील ठेकेदारांची एक बैठक 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

हेही वाचा – Accident News : नाशिकहून गुजरातला जाणारी भाविकांची बस दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू, 15 जखमी

भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जवळपास 3 लाख ठेकेदार आहेत, जे राज्य सरकारच्या विविध लहान – मोठ्या प्रकल्पांसाठी काम करत आहेत. या तीन लाख ठेकेदारांवर अवलंबून असलेले लोक हे कोट्यवधींच्या घरात आहेत. जर जुलै 2024 पासून पैसेच मिळाले नसतील तर आम्ही काम कसं सुरू ठेवायचं, असा सवाल भोसले यांनी विचारला आहे. तसेच, वारंवार पत्रे पाठवूनही आम्हाला सरकारकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई ठेकेदार असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष दादा इंगळे यांचा दावा आहे की, मुंबई सर्कलमधील केवळ तीन विभागांचे जवळपास 600 कोटींची बिले प्रलंबित आहेत. अशाप्रकारे वेळेवर निधी मिळत नसल्याने आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे नुकसान ठेकेदारांना सहन करावे लागते आहे.

ठेकेदारांचे किती पैसे बाकी?

पीडब्ल्यूडी : 46,000 कोटी रुपये
जलजीवन मिशन : 18,000 कोटी रुपये
ग्रामीण विकास : 8,600 कोटी रुपये
जलसिंचन विभाग : 19,700 कोटी रुपये
शहर विकास : 17,000 कोटी रुपये



Source link

Comments are closed.