Maharashtra Politics Nana Patole and Praful Patel on same platform at Bhandara


भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव येथे शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

भंडारा : गेल्या तीन वर्षांमध्ये राज्याचे राजकारण पूर्णतः बदलले आहे. आधी एकमेकांचे मित्र असलेले राजकारणी आता एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. असेच एक नाव आहे, ते भंडारा जिल्ह्यातील खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार नाना पटोले. पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. महाविकास आघाडीतून अजित पवारांचा गट बाहेर पडल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल झाला. काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे एकमेकांचे कट्टर विरोधक बनले असून विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत या दोघांमधील आरोप-प्रत्यारोप महाराष्ट्राने पाहिले. पण एका कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही एकत्र आल्यानंतर त्यांच्या एका कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. (Maharashtra Politics Nana Patole and Praful Patel on same platform at Bhandara)

भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव येथे शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. राजकारणाच्या मंचावरून एकमेकांवर आरोप करणारे, टीका करणारे नेते यावेळी मात्र चक्क एकमेकांची गळाभेट करताना पाहायला मिळाले. तर या दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याचवेळी चर्चा सुद्धा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांशी काय बोलले? याबाबत आता विविध चर्चा तर सुरू झाल्याच आहेत. परंतु, यांची गळाभेट म्हणजे भविष्यातील इतर काही संकेत तर नाही ना, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र आणि त्या अंतर्गत येत असलेल्या सातही विधानसभा मतदारसंघांवर आपलेच वर्चस्व राहावे, याकरिता प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता त्यांची एका कार्यक्रमानिमित्त झालेली भेट अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

हेही वाचा… Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांचा आयोजकांना सल्ला; म्हणाले…

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत दावा करत महत्त्वाचे विधान केले होते. विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी आमगाव येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये भाषणादरम्यान मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिला होता. राजकुमार पुराम याला आमदार बनवायचे आहे. नाही बनवले तुम्ही तर महाराष्ट्रात नानाभाऊ उद्या काय बनणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही एक एक आमदार नाही दिले तर अडचण येणार आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिल्याचे पाहायला मिळाले होते. यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार पलटवार केला होता. नाना पटोले हे स्वयंभू घोषित मुख्यमंत्री आहेत. असे म्हणण्याने कोणीही काही बनत नाही. महाराष्ट्रामध्ये तुमचे सरकार आले पाहिजे, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला होता.

प्रफुल्ल पटेल यांच्या टीकेनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगला. विधानसभेच्या अनेक सभांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांच्यावर विधानसभा निवडणुकीत मात केल्याचे पाहायला मिळाले. भंडारा जिल्ह्यातील विधानसभेच्या सातपैकी सहा जागा जिंकून पटेल यांनी वर्चस्व गाजवले. त्यामुळे हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांचे कट्टर विरोधक बनले. पण आता एका कार्यक्रमातील भेटीनंतर भंडाऱ्यातील आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील राजकीय समिकरण तर बदलणार नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.



Source link

Comments are closed.