Sanjay Raut’s comment on unemployment while sharing a cartoon
केंद्रीय अर्थसंकल्पात वार्षिक 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर करसवलत दिली असली तरी, प्रत्यक्षात याचा फायदा किती जणांना होणार आहे. त्यातही बेरोजगारीचा प्रश्न आहेच.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीातारामन यांनी शनिवारी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये त्यांनी वार्षिक 12 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त करून नोकरदारांना सुखद धक्का दिला आहे. मात्र, या घोषणेत फोलपणा असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. तर, पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कार्टून शेअर करत बेरोजगारीवर बोट ठेवले आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जातील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. प्राप्तिकराच्या स्लॅबबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली. त्यानुसार 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तर, 18 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 70 हजार रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. या घोषणेमुळे करदात्या नोकरदार मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे.
शुभ प्रभात! pic.twitter.com/PqP0zS5fNr
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 3, 2025
असे असले तरी, यातून फारसा कोणाला लाभ मिळणार नाही, असा दावा ठाकरे गटाने करत, पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात याचे गणितच मांडले आहे. मुळात देशात किती लोक इन्कम टॅक्स भरतात? तर साधारण साडेतीन कोटी लोक. त्यातील दोन कोटी लोकांचे उत्पन्न सात लाखांपेक्षा कमी आहे. म्हणजे, त्यांना आधीच सूट मिळाली आहे. दीड कोटीत फार तर 80-85 लाख हे पगारदार किंवा नोकरदार असतील. त्यातील 50 लाख लोकांचे पगार 12 लाखांच्या आसपास आहेत. मग उरले किती? तर साठेक लाख. म्हणजे नव्या कर प्रणालीचा फायदा फार तर पन्नासेक लाख लोकांना होईल, पण ढोल असे वाजवले जात आहेत की, 45 कोटी लोकांना फायदा होणार आहे’, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
तर दुसरीकडे, देशात बेरोजगारीचा प्रश्नही वाढत चालला आहे. पुण्याच्या एका आयटी कंपनीने 100 जागांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ची जाहिरात दिली होती. त्यासाठी जवळपास तीन हजारांवर तरुण आयटी इंजिनीअर्सची रांग लागल्याचा व्हिडीओ अलीकडे व्हायरल झाला होता. त्यावरूनही ठाकरे गटाने मोदी तसेच फडणवीस सरकारला लक्ष्य केले होते. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे तरुण-तरुणी नोकरीच्या आशेने येत असतात. मात्र या व्हिडीओने पुण्यात नोकऱ्यांची कशी वानवा आहे, सरकारचे सर्व दावे कसे पोकळ आहेत हेच दाखवून दिले, असे या ठाकरे गटाने म्हटले होते.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक कार्टून शेअर केले आहे. तुम्हाला प्राप्तिकरातून दिलासा दिला आहे, आता तुम्हाला आणखी काय हेवे? असे (केंद्र सरकारकडून) लोकांना विचारले जाते. त्यावर ‘उत्पन्न’ असे उत्तर दिले जाते. या कार्टूनद्वारे संजय राऊत यांनी बेरोजगारीकडे लक्ष वेधले आहे. (Sanjay Raut about Budget: Sanjay Raut’s comment on unemployment while sharing a cartoon)
हेही वाचा – Budget 2025 : 12 लाख करसवलतीचा फायदा कोणाला? शिवसेना ठाकरे गटाने आकडेवारीसह मांडले गणित
Comments are closed.