हे सरळ मार्गानं आलेलं सरकार नाहीये! हायकोर्टाच्या नोटिसीवरून संजय राऊत यांची महायुतीला सणसणीत चपराक

महायतीवरील संजाचे प्रकरण

मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस दिल्याचं वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. त्यावेळी ही नोटीस देण्यात आल्याचं वृत्त आहे. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना महायुती सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे.

नाशिक येथे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘आम्ही सगळे निवडणूक आयोगाकडे वारंवार गेलो. निवडणूक आयोग एकच म्हणत राहिला की ऐसा हो सकता है. अरे कसं होऊ शकतो? 76 लाख? या 76 लाखांची जर साधारण 150 मतदारसंघाप्रमाणे त्याची विभागणी केली तर सरासरी प्रत्येक मतदारसंघात जवळपास 25 ते 30 हजार मतं वाढवली आहे. तर त्याचे प्रत्येक बूथवर 100 ते 200 मतं वाढवली आहेत’.

असा आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी ही सत्ता स्थापन होण्यासाठी पडद्यामागे मोठी पट कथा लिहिल्याचंही म्हटलं. ‘हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार स्थापन होऊ शकलं. हे सरळ मार्गानं आलेलं सरकार नाहीये. यासाठी खूप मोठी पडद्यामागे पटकथा लिहिली गेली आणि अनेक खलनायकांनी त्यात काम केलं. हायकोर्टानं जे विचारलं ते बरोबर आहे. पण जनतासुद्धा तेच विचारते आहे’, असं संजय राऊत म्हणाले.

‘नाशिकमध्ये जे जिंकले त्यांनी आपली विजयी मिरवणूक काढली नाही. त्यांना अजून खात्री नाही की आम्ही जिंकलो आहोत आणि इतक्या लाखा लाखाच्या मतांनी जिंकलो आहोत’, असा चिमटा देखील संजय राऊत यांनी महायुतीच्या विजयी उमेदवारांना काढला.

उच्च न्यायालयानं दिलेल्या नोटीसीसंदर्भात ते पुढे म्हणाले की, ‘हायकोर्टाने प्रश्न विचारला आहे. पण या प्रश्नाच्या टोकापर्यंत ते गेले तरच या देशाच्या लोकशाहीला एक भक्कम आधार मिळेल. कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं तर या देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास जो घसरत चालला आहे तो पुन्हा एकदा विश्वास मजबूत होईल’.

Comments are closed.