मीनाताई ठाकरे रक्तपेढीने प्रत्येक गरजूला वेळोवेळी मदत केली, रक्त संक्रमण परिसंवादात सुभाष देसाई यांचे गौरवोद्गार

जे गरजू आहेत त्यंची जबाबदारी आपल्यावर आहे याचे भान आपण बाळगले पाहिजे. आम्ही मुंबई महापालिकेच्या माध्यमातून 24 तास कार्यरत असलेली मीनाताई ठाकरे रक्तपेढी उभारली आणि या रक्तपेढीने प्रत्येक गरजूची वेळोवेळी मदत केली, असे गौरवोद्गार रक्तपेढीचे मार्गदर्शक शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काढले. ‘रक्त संक्रमणाचे भविष्य आणि आव्हाने’ या विषयावर मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या वतीने गोरेगाव पश्चिम, ओझोन ऑक्टिव्हीटी सेंटर येथे सेमिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

सुभाष देसाई यांनी यावेळी मीनाताई ठाकरे रक्तपेढीतील डॉक्टर्स. कर्मचाऱ्यांच्या कामाची प्रशंसा केली. 2004 मध्ये जेव्हा या रक्तपेढीची स्थापना ढाली तेव्हा मुंबईत केवळ भगवती आणि कूपर रुग्णालयात रक्तपेढय़ा होत्या. मला अभिमान आहे की, आमची रक्तपेढी संपूर्णतः महिला तंत्रज्ञ आणि कर्मचारी चालवतात, असेही ते म्हणाले. त्यांनी रक्तपेढीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रबोधन गोरेगावचे खजिनदार आणि रक्तपेढीचे प्रमुख रमेश  इस्वलकर आणि प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी पुढाकार घेतला. यावेळी सुरक्षित, तत्पर रक्त संक्रमण आणि रक्तपेढय़ांची भूमिका या विषयी चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते. डॉ. निधी मेहता, डॉ. सुचेता तुंगार, डॉ. श्रीनाथ  क्षीरसागर, डॉ. भाविक शाह, डॉ. ह्षित हरबाडा, डॉ. मोनल शाह, डॉ. रिंकू भाटिया, डॉ. लिंसी जेकब यांनी चर्चेत सहभाग घेतला. मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या तंत्रज्ञान पर्यवेक्षिका मनीषा बनसुडे यांनी आभार प्रदर्शन केले.

आजपर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा जीव वाचवला

आजपर्यंत या रक्तपेढीद्वारे 3 लाख 97 हजार 753 रुग्णांचा जीव वाचवण्यात आला, तर 9 हजार 316 थॅलेसेमियाग्रस्त बालकांनी विनामूल्य लाभ घेतला. मुंबई मनपा आणि अन्य सरकारी रुग्णालयांना 17 हजार 125 रक्त पिशव्या मोफत पुरवण्यात आल्या, अशी माहिती कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका डॉ. मृण्मयी भजक यांनी दिली. यावेळी मीनाताई ठाकरे रक्तपेढीवरील एक ध्वनी चित्रफीतही दाखवण्यात आली.

Comments are closed.