नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार
नाशिक गुन्हा: गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या (Nashik Crime News) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सावतानगर परिसरात तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका नामवंत बिल्डरच्या (Builder) घरावर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दिंडोरी रोडवर एका नामवंत बिल्डरचे घर असून आज शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर दोन अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक केली. दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता. एकाने बंदूक काढून बिल्डरच्या घराच्या दिशेनं गोळीबार केला. तर दुसऱ्या हल्लेखोराने दगडफेक केली. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहे. दोन दिवसांपूर्वीच या बिल्डरच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली होती.
म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भल्या पहाटे अशाप्रकारे गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अज्ञातानी घरावर गोळीबार करून पळ काढला असून या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपाराकडून दोघांवर कोयत्याने वार
दरम्यान, सावतानगर परिसरात एका सराईत रेकॉर्डवरील तडीपार असणाऱ्या गुन्हेगाराने कोयत्याने दोन जणांवर गंभीर स्वरूपाचे वार करून परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रकार बुधवारी रात्री केला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास रेकॉर्ड वरील संशयित गुन्हेगार पवन वायाळ याच्यासह अन्य दोन जणांनी परिसरात कोयते घेऊन नागरिकांना शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रस्त्यावर मित्रांसोबत गप्पा मारत उभे असलेले पंकज प्रल्हाद देसले (37, रा. सावतानगर) यांच्यावर पवन वायाळ याने कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. येथून पुढील पाच ते दहा मिनिटात त्रिमूर्ती चौकात कमल वाईन शॉप समोर उभे असलेला अमोल शिंदेयाच्यावरही कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. यासह अन्य दोन-तीन जणांवर कोयते उगारल्याची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. संशयित आवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित पवन वायाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.