Mumbai High Court stand on continuing the hearing of Akshay Shinde fake encounter
गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी आम्हाला खटला चालवायचा नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांच्या भूमिकेनंतरही मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरूच राहणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे.
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. यानंतर अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेत अक्षय शिंदे याचा फेक एन्काऊंटर झाल्याचा दावा केला होता. यानंतर चौकशीतही अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर झाल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणात अनेक खुलासे होतील, असे वाटले होते. मात्र गुरुवारी (6 फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी आम्हाला खटला चालवायचा नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांच्या भूमिकेनंतरही मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरूच राहणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. (Mumbai High Court stand on continuing the hearing of Akshay Shinde fake encounter)
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी बनावट चकमकीत मुलाची हत्या केल्याचा आरोप करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर अक्षय शिंदेची बनावट चकमकीत हत्या झाल्याचे दंडाधिकारी चौकशीत निष्पन्न झाले होते. याप्रकरणी अक्षय शिंदेच्या मृत्यूस पोलीस वाहनाच्या चालकासह पाच पोलीस जबाबदार असल्याचं सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने 20 जानेवारीला सरकारला दिले होते. यानंतर गुरुवारी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर प्रकरणी दोषी असलेल्या पाच पोलिसांवर काय कारवाई केली? हे जाणून घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
दिवसाचे काम संपताना न्यायालयात उपस्थित असलेल्या अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी पुढे येत हे प्रकरण आम्हाला लढवायचे नाही, अशी विनंती न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांना हात जोडून केली. तुम्ही असा निर्णय का घेत आहात? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? असे प्रश्न न्यायालयाने विचारले. त्यावर अक्षय शिंदेचे आई-वडील म्हणाले की, ‘आम्हाला आता धावपळ जमत नाही. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आमच्या सुनेला नुकतेच मूल जन्माला आलेले आहे. त्यामुळे आम्हाला आता तिथे जायचे आहे. ही दररोजची धावपळ आणि प्रवास आम्हाला जमत नाही. आमच्या राहण्याची सोय कुठेही नाही. त्यामुळे आम्हाला ही न्यायालयीन लढाई लढायचा नाही, असे अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले. यानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली.
हेही वाचा – Fadnavis On Gandhi : ही तर आणखी एका फेक नरेटिव्हची तयारी, काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस –
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर तुम्हाला न्यायालयात यायची गरज नाही. याप्रकरणी तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, मात्र सुनावणी सुरूच राहणार आहे. कारण आम्ही तुम्हाला बोलावलं नव्हतं, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आता अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे.
वकील अमित कटारनवरे काय म्हणाले?
आज सुनावणी पार पडल्यानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांचे वकील अमित कटारनवरे यांनी माध्यमांना सांगितले की, राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली होती. त्याची काही कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे आजची सुनावणी तहकूब करत पुढील सुनावणी 24 तारखेला होणार आहे. अक्षयच्या आई वडिलांनी जरी या प्रकरणातील याचिका मागे घतली असली तरी आम्ही लढा सुरूच ठेवणार आहोत, अशी माहिती अमित कटारनवरे यांनी दिली.
Comments are closed.