या आरोपांना आयोग लेखी प्रतिसाद देईल.

महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा घोटाळ्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षाही तेथील मतदारांची संख्या जास्त दाखविण्यात आली आहे, असे सनसनाटी वक्तव्य त्यांनी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. गांधी यांचे हे आरोप पूर्णत: खोटे असून लेखी उत्तराच्या माध्यमातून ते खोडून काढले जातील, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी केली आहे.

राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 9 कोटी 40 लाख आहे. मात्र महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मतदारांची संख्या 9 कोटी 70 लाख आहे. लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक अशी असू शकते, असा प्रश्न राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याच्या आपल्या जुन्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. काही दिवसांपूर्वी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण चर्चेतही त्यांनी या आरोपाचा उच्चार केला होता.

खरी परिस्थिती काय आहे…

महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणत: 9 कोटी 40 लाख आहे, असे गांधी यांचे म्हणणे आहे. तथापि, 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 मध्ये 11 कोटी 24 लाख इतकी होती. त्यानंतर आता चौदा वर्षे उलटून गेली आहेत. भारताच्या लोकसंख्या वाढीचा वार्षिक वेग लक्षात घेता आता महाराष्ट्राची लोकसंख्या किमान 13 कोटी आहे. तथापि, राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार ती 9 कोटी 40 लाखच आहे. हे कसे शक्य आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. राहुल गांधी यांनी या बाबीचा खुलासा आपल्या पत्रकार परिषदेत केलेला नाही.

70 लाख मतदार वाढल्याचा आरोप

2024 ची लोकसभा निवडणूक ते 2024 ची विधानसभा निवडणूक या कालावधीत महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत जवळपास 70 लाख मतदारांची वाढ झाली आहे, असाही आरोप गांधी यांनी अनेकदा केला आहे. इतके मतदार कसे वाढले, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच अन्य छोटे पक्ष यांच्या महायुतीला प्रचंड विजय मिळाला होता. या महायुतीला 288 जागांपैकी 232 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि इतर छोटे पक्ष यांच्या महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीची मतगणना झाल्यापासूनच घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. प्रथम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये घोटाळ्याचा आरोप केला गेला. मात्र, नंतर तो मागे पडला. त्यानंतर मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचा आरोप केला जात आहे.

प्रत्येक आरोप गांभीर्याने घेणार

महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही निवडणुकीसंदर्भात कोणत्याही पक्षाने आरोप केले असल्यास ते गांभीर्याने घेतले जातील, असे प्रतिपादन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. ‘एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या संदेशात आयोगाने ही बाब स्पष्ट केली आहे. तसेच प्रत्येक आरोपाला लेखी उत्तर दिले जाईल. लवकरच आयोगाकडून आरोपांना अशा प्रकारे उत्तर दिले जाईल. आयोगाने सर्व निवडणुका पूर्णत: नियमांच्या अनुसार आणि कायद्याच्या चौकटीतच घेतल्या आहेत. त्यामुळे संशयाला कोणतीही जागा नाही. तथापि, कोणाला काही शंका असतील, तर त्यांचे निराकरण केले जाईल, असेही प्रतिपादन आयोगाने वारंवार केले आहे.

Comments are closed.