कर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा
बऱ्याच काळानंतर रेपो दरात पाव टक्का कपात, मासिक हप्ता होणार कमी, कर्जे होणार स्वस्त
वृत्तसंस्था / मुंबई
केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गाला सुखावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेनेही रेपो दरात कपात करून कर्जधारकांना दिलासा दिला आहे. रेपो दरात पाव टक्का किंवा 25 बेसिस पॉईंटस्ने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा दर 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्के असा कमी झाला आहे. या दरकपातीचा लाभ गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा व्यक्तिगत कर्ज घेतलेल्यांना होणार असून त्यांचा कर्जफेडीचा मासिक हप्ता कमी होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ज्या व्याजदाराने इतर बँकांना कर्ज देते, त्या दराला रेपो दर म्हणतात. हा दर कमी झाल्यास बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कमी दरात कर्ज मिळते. त्यामुळे या बँका कर्जधारकांना दिलेल्या कर्जांवरील व्याजही विशिष्ट प्रमाणात कमी करतात. साहजिकच यामुळे कर्जधारकांचा मासिक हप्ता त्या प्रमाणात कमी होतो.
कोरोना उद्रेकापासून प्रथमच
2020 मध्ये देशात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून प्रथमच रेपो दरात कपात करण्यात आली आहे. मे 2020 ते एपिल 2022 या काळात रेपो दर 4 टक्के या पातळीवर स्थिर ठेवण्यात आला होता. त्यानंतर मात्र, त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. फेब्रुवारी 2023 पर्यंत तो 6.5 टक्के या पातळीवर पोहोचला. त्यानंतर गेली सलग दोन वर्षे तो याच पातळीवर स्थिर ठेवण्यात आला. आता त्यात कपात करण्यात आली आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
बँकेने दिले कारण
अर्थव्यवस्थेला अधिक वेग येण्यासाठी कर्जे काही प्रमाणात स्वस्त होण्याची आवश्यकता आहे. व्याजदर कमी केल्यास कर्जे स्वस्त होतात. त्यामुळे कर्जांना मागणी वाढते. अशाप्रकारे गुंतवणूक वाढून अर्थव्यवस्था अधिक वेगवान होते. त्यामुळे रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट पेले गेले.
लाभ कसा होणार
या निर्णयाचा लाभ अनेक प्रकारच्या कर्जधारकांना होणार आहे. त्यांच्यात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि व्यक्तिगत कर्ज यांचा प्रामुख्याने समावेश आहे. व्याजदर कमी झाल्याने कर्जफेडीच्या मासिक हप्त्यात काहीशी घट होणार असल्याने कर्जधारकांवरचे ओझेही किंचित कमी होईल, अशी स्थिती आहे.
परिणाम केव्हा जाणवणार…
रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीचा निर्णय घेतला असला तरी लोकांनी ज्या बँकेकडून कर्ज घेतले असेल, त्या बँकेने कर्जांवरील व्याजदरात कपात घोषित केल्यानंतर या निर्णयाचा लाभ लोकांपर्यंत पोहचणार आहे. बँका जितक्या प्रमाणात व्याजदरात कपात करतील, त्या प्रमाणात हा लाभ कर्जधारकांना घेता येणार आहे.
आपला पैसा कसा वाचणार…
- गृहकर्ज
ड समजा, आपण 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी घेतले असेल तर त्यावर 8.5 टक्के व्याजदराने आपल्याला महिन्याला 43,059 रुपयांचा हप्ता लागतो. व्याजदरात पाव टक्का कपात झाल्यास आपल्याला 42,452 रुपये मासिक हप्ता बसेल. महिन्याला 607 रुपये तर वर्षाला 7,284 रुपये वाचतील.
- व्यक्तिगत कर्ज
ड समजा आपण 12 टक्के व्याजदराने 5 लाख रुपयांचे व्यक्तिगत कर्ज घेतले आहे. यावर सध्याच्या दरानुसार आपल्याला महिन्याला 11,282 रुपयांचा हप्ता भरावा लागतो. व्याजदरात पाव टक्का कपात झाल्यास आपला मासिक हप्ता 11,149 रुपये होईल. आपले महिन्याला 133 तर वर्षाला 1,596 रुपये वाचतील.
- वाहन कर्ज
समजा, आपण कारसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज 7 वर्षांकरिता 9.5 टक्के व्याजदराने घेतले असेल, तर मासिक हप्ता 16,650 रुपये बसतो. व्याजदरात पाव टक्का कपात झाल्यास आपला मासिक हप्ता 152 रुपयांनी कमी होईल. याचाच अर्थ महिन्याला 152 रुपये, तर एक वर्षाला 1,824 रुपये वाचणार आहेत.
Comments are closed.